महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या अभ्यासक्रमातील मराठी आराखडय़ात असलेल्या चुकांनी उमेदवारांचा प्रचंड गोंधळ उडाला आहे. इतर अनेक विषयांतील भाषांतर प्रमादांसह भूगोल या विषयातील अशक्यतावाद आणि असंभववाद या शब्दप्रयोगांचा अर्थ समजून घेण्यासाठी त्यांची तारांबळ उडाली आहे.

आयोगाने राज्यसेवा परीक्षेच्या अभ्यासक्रमात यंदा बदल केले. या अभ्यासक्रमाचे मराठीत भाषांतर करताना कित्येक संकल्पना चुकीच्या देण्यात आल्याचा आक्षेप तज्ज्ञांनी घेतला आहे. नव्या अभ्यासक्रमाचा आराखडा आयोगाने जाहीर केला. मात्र त्यातील मराठी आराखडा वाचून तो नक्की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचाच आराखडा आहे का, असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. आयोगाच्या मराठी आराखडय़ात अनेक संकल्पना देताना चुकीचे भाषांतर करण्यात आल्यामुळे गोंधळ होत आहे. इंग्रजी आराखडय़ात संकल्पना, त्यांचे नामाभिधान योग्य देण्यात आले आहे. मात्र त्याचे मराठीतील स्वरूप चुकीचे देण्यात आल्याचा आक्षेप उमेदवार आणि तज्ज्ञांनी घेतला आहे.

काही मासले..

भूगोल विषयात अशक्यतावाद किंवा असंभववाद असे शब्दप्रयोग आहेत. मात्र अशी कोणतीही विचारसरणी नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. कृषी विषयात कोरडवाहू शेती असा नेमका शब्द असताना पावसालंबी शेती म्हटले आहे. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान अशा सर्वच विषयांत चुका असल्याचे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे फारुक नाईकवडे यांनी सांगितले. अनेक विषयांचे मर्यादित साहित्य मराठीत आहे. असे असताना आयोगाने दिलेल्या आराखडय़ातील चुकांमुळे गोंधळ होत असल्याचे उमेदवारांनी सांगितले.

आक्षेप काय?

काही संकल्पना आणि शब्दांना मराठीत प्रतिशब्द असताना ढोबळ भाषांतर करण्यात आले आहे. काही ठिकाणी चुकीचे शब्द वापरण्यात आल्यामुळे उमेदवारांचा गोंधळ होत आहे. एका इंग्रजी शब्दाचे अनेक अर्थ असताना त्यातील चुकीचा अर्थ मराठी भाषांतर करताना वापरण्यात आला असल्याचेही दिसत आहे.