नेतेमंडळींना शरद पवारांच्या कानपिचक्या

नेतेमंडळी पक्षाच्या कार्यालयांमध्ये फिरकत नाहीत, लोकांचे विविध प्रश्न हाती घेण्याची आवश्यकता असताना तसे होताना दिसत नाही, असे परखड मत व्यक्त करीत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचा कारभार सुधारा, असे फर्मान बुधवारी सोडले. सोलापूरमधील पराभवाबद्दल चिंता व्यक्त करतानाच ठाण्यातील नगरसेवकांच्या नाराजीचा मुद्दाही मांडला.

पक्षाध्यक्ष पवार यांनी पक्षाच्या निवडक नेत्यांच्या उपस्थितीत आगामी राजकीय वाटचालीबद्दल काही सूचना केल्या. प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, वसंत डावखरे, जयंत पाटील, राजेश टोपे आदी नेतेमंडळी याप्रसंगी उपस्थित होती. विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला. काँग्रेसने विरोधात भूमिका घेतल्याने पराभव झाला, असा स्थानिक नेत्यांचा आक्षेप असला तरी पक्षांतर्गत सारे काही सुरळीत नव्हते, असे मत पवार यांनी मांडल्याचे समजते. मुंबईत राष्ट्रवादीबद्दल संशयाचे वातावरण का तयार झाले व त्याची सोलापूरमध्ये प्रतिक्रिया उमटली का, याचा विचार झाला पाहिजे. ठाणे महापालिकेलीत नगरसेवकांच्या नाराजीचा उल्लेख पवार यांनी भाषणात केला. हे सारे नगरसेवकांचे दबावतंत्र असल्याचे पक्षाच्या वर्तुळात बोलले जाते.

विरोधी पक्षाची जागा घ्या

विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल लक्षात घेता प्रभावी विरोधी पक्ष म्हणून भूमिका वठविण्याची राष्ट्रवादीला संधी आहे. पक्षाने ही भूमिका प्रभावीपणे बजवावी, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली. या वर्षांअखेर नगरपालिकांच्या निवडणुका असून, त्यापाठोपाठ जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. गेल्या वेळी राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकाचा पक्ष होता हे स्थान कायम राखले गेले पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त करतानाच त्यासाठी आतापासून तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले.  प्रत्येक नेत्याकडे जिल्ह्याची जबाबदारी सोपविली जाणार आहे.

पुढील तीन महिन्यांमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने दुष्काळग्रस्त, शेतकरी, बेरोजगार आणि सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. पिण्याच्या पाण्याची परिस्थिती आगामी काळात चिंताजनक होण्याची शक्यता आहे.  यावर मात करण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची सूचना पवार यांनी केली.