यंदापासून सामाजिक शास्त्रांसाठीची तोंडी परीक्षा वगळली; अनुभवावर आधारित प्रश्नांवर भर

शाळांमधील अंतर्गत गुणांच्या किंवा तोंडी परीक्षेच्या आधारे दहावीच्या निकालामध्ये दिसणाऱ्या उंच उडय़ा बंद करण्याच्या दृष्टीने राज्यमंडळाने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. येत्या वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांची सामाजिक शास्त्रांसाठी घेण्यात येणारी तोंडी परीक्षा बंद होणार असून त्यामुळे सहज मिळणाऱ्या पैकीच्या पैकी गुणांना कात्री लागणार आहे.

याऐवजी विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्राची शंभर गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामध्ये ६० गुण हे इतिहास, राज्यशास्त्र यांच्यासाठी आणि ४० गुण हे भूगोल अशी विभागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भाषेप्रमाणेच सर्व विषयांसाठीही कृतिपत्रिका म्हणजेच पुस्तकांतील पाठांपेक्षा विषयाच्या वापरावर आधारित प्रश्न असणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांना आपल्या भवतालाच्या आकलनाला उत्तरामध्ये मांडावे लागणार असल्याने परीक्षेत खरा कस लागणार आहे.

सर्व विषयांसाठी कृतिपत्रिका यापूर्वी भाषा विषयांसाठी मंडळाने कृतिपत्रिका लागू केल्या आहेत. पाठामधील माहितीच्या आधारे प्रश्न विचारण्याऐवजी विद्यार्थ्यांना माहितीचा वापर करावा लागेल असे प्रश्नांचे स्वरूप असते. इतिहासात संकल्पना चित्र पूर्ण करणे, घटना कालानुक्रमे मांडता येणे, घटनांमधील संदर्भाच्या अनुषंगाने ओघतक्ता तयार करता येणे, उताऱ्यावरील प्रश्न, घटनांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मत मांडता येईल असे प्रश्न यामध्ये विचारण्यात येतील. संकल्पनांबरोबरच अनुभवावर आधारित प्रश्न कृतिपत्रिकेत असणार आहेत. उदाहरणार्थ, वारली चित्रशैलीतील चित्र देऊन त्याचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांनी त्याची वैशिष्टय़े मांडणे, निवडणूक प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना मत मांडण्यास सांगणे अशा स्वरूपाचे प्रश्न यांमध्ये असणार आहेत. विज्ञान विषयांत आकृतीचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्न विचारणे, आकृत्यांवरून भौतिकशास्त्रातील संकल्पना स्पष्ट करणे अशा स्वरूपाची प्रश्नरचना असेल. यामध्ये दीघरेत्तरी प्रश्नांपेक्षा लघुत्तरी आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांचे प्रमाण अधिक असेल. मुलांना विषयाचे आकलन किती झाले आणि संकल्पनांचा प्रत्यक्ष वापर कसा करता येतो याची चाचणी व्हावी असे प्रश्नांचे स्वरूप कृतिपत्रिकांमध्ये असेल. कृतिपत्रिकांमध्ये विद्यार्थ्यांना अनुभवाची मांडणी करता येणे, निरीक्षण करणे आणि पाठय़पुस्तकापलीकडील माहिती मिळवणे गरजेचे असणार आहे.

कृतिपत्रिकेतील अनुभव आणि निरीक्षणावर आधारित प्रश्नांची उदाहरणे

  • उपयोजित इतिहासातून व्यवसायाच्या कोणत्या संधी मिळतील? (इतिहास)
  • तुमच्या गावातील अथवा शहरातील राजकीय पक्ष जनता आणि शासन यांच्यातील दुवा कसा साधतात? (राज्यशास्त्र)
  • दोन पर्यटन स्थळे निवडा, त्यामागील कारण स्पष्ट करा आणि त्या ठिकाणी क्षेत्रभेटीसाठी कोणते साहित्य न्यावे लागेल याची यादी करा (भूगोल)
  • चिपको आंदोलनासारख्या आंदोलनाची आजच्या काळातही गरज आहे हे तुम्ही अनुभवलेल्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करा (विज्ञान)

नवे काय?

नव्या रचनेमध्ये धडय़ांवरील वस्तुनिष्ठ किंवा विस्तारित प्रश्नांचे स्वरूप कमी करून प्रत्यक्ष विषयाच्या वापरावर किंवा अनुभवावर आधारित प्रश्नांवर भर देण्यात आला आहे. दहावीला सर्वच विषयांसाठी अंतर्गत मूल्यमापनासाठी २० गुण तर लेखी परीक्षेसाठी ८० गुण अशी विभागणी करण्यात आली होती. विज्ञानासाठी प्रात्यक्षिके, गणितासाठी अंतर्गत मूल्यमापन यांच्याबरोबर भाषेसाठी आणि इतिहास-भूगोलासाठी प्रकल्प आणि तोंडीपरीक्षा घेण्यात येत होती. मात्र दहावीच्या नव्या अभ्यासक्रमानुसार यंदापासून इतिहास, भूगोलासाठीची तोंडी परीक्षा बंद करण्यात आली आहे. दोन्ही विषय मिळून शंभर गुणांची लेखी परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागेल.

अभ्यास मंडळेच प्रश्नपत्रिका काढणार

आतापर्यंत दहावी आणि बारावीची परीक्षा घेणारे राज्यमंडळ पाठय़पुस्तकांवर आधारित प्रश्नपत्रिका तयार करत असे. मात्र आता पुस्तके तयार करणारे अभ्यास मंडळच दहावीच्या प्रश्नपत्रिकाही काढणार आहे अशी माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे दहावीच्या परीक्षेचे नियोजन करणे, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करणे आणि निकाल जाहीर करणे एवढय़ापुरतेच राज्यमंडळाचे काम मर्यादित राहणार आहे.

गुणविभागणी कशी?

इतिहास आणि राज्यशास्त्र अशा विषय संचाची आणि भूगोलाची परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात येईल. इतिहास आणि राज्यशास्त्राची परीक्षा एकूण ६० गुणांची असेल. त्यामध्ये इतिहासावरील प्रश्न ४० गुणांचे आणि राज्यशास्त्रावर २० गुणांचे प्रश्न असतील. प्रश्न क्रमांक सहापासून नऊपर्यंत राज्यशास्त्रावरील प्रश्न विचारण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अडीच तास मिळतील. यापूर्वी भूगोलाबरोबर अर्थशास्त्र असा स्वतंत्र विषय होता. मात्र आता अर्थशास्त्राचा समावेश भूगोलातच करण्यात आला आहे. त्यामुळे अर्थशास्त्रासाठी वेगळा प्रश्नसंच असणार नाही. भूगोलासाठी ४० गुणांची परीक्षा घेण्यात येणार असून त्यासाठी दोन तासांचा कालावधी असेल.

दहावीच्या पुस्तकांत आमूलाग्र बदल

परीक्षेपुरते पुस्तकातील उतारे पाठ करायचे आणि नंतर नावडीच्या विषयांशी फारकत घ्यायची ही पारंपरिक साखळी यंदा दहावीच्या पुस्तकांतून हद्दपार करण्यात आली आहे. नव्याने प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये माहितीची जंत्री न देता व्यवहारात उपयोग करता येईल अशी रचना करण्यात आली आहे.