22 January 2020

News Flash

…आणि हॉलंड अॅमस्टरडॅमला निघालेले विमान कोसळले घाटकोपरमध्ये

मुंबईत पहिल्यांदाच अशा प्रकारची विमान दुर्घटना घडली असावी असे अनेकांना वाटत असेल पण तसे नाहीय. घाटकोपरमधली ही दुसरी विमान दुर्घटना आहे.

मुंबईत दोन दिवसांपूर्वी घाटकोपरमध्ये नागरीवस्तीच्या भागात चार्टर्ड विमान कोसळले. या घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे. मुंबईत पहिल्यांदाच अशा प्रकारची विमान दुर्घटना घडली असावी असे अनेकांना वाटत असेल पण तसे नाहीय. घाटकोपरमधली ही दुसरी विमान दुर्घटना आहे. बरोबर ६९ वर्षांपूर्वी १२ जुलै १९४९ रोजी केएलएम हे प्रवासी विमान घाटकोपर आणि पवईच्यामध्ये कोसळले होते.

या दुर्घटनेत १४ अमेरिकन पत्रकारांसह ४५ लोकांचा मृत्यू झाला होता. हॉलंड, यूके, कॅनडा आणि चीनच्या नागरिकांचा या अपघातात मृत्यू झाला होता. हा अपघात इतका भीषण होता कि, अर्धा किलोमीटरच्या परिसरात मृतदेहांचे अवयव विखरुन पडलेले होते. वैमानिकाचा कॉकपीटमध्येच जळून मृत्यू झाला होता. त्या काळातील भारतामधील ही सर्वात मोठी हवाई दुर्घटना होती.

केएलएमचे हे विमान बाटाव्हीया येथून हॉलंड अॅमस्टरडॅम येथे निघाले होते. बाटाव्हीया इंडोनेशियामध्ये आहे. या विमानाला दिल्लीवरुन कराचीला जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे हे विमान मुंबई सांताक्रूझ विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आले. सांताक्रूझ विमानतळावर इंधन भरल्यानंतर हे विमान कैरोच्या दिशेने मार्गस्थ होणार होते.

अपघात घडला त्यावेळी दृश्यमानता कमी होती तसेच वैमानिकाच्या चूक असल्याचा निष्कर्ष या अपघाताच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने काढला होता. अपघाताआधी वैमानिकाला पवई रेंजमधून जाऊ नको असे सांगण्यात आले होते. सकाळी ९.२५ च्या सुमारास वाहतूक नियंत्रण कक्षाशी विमानाचा रेडिओ संपर्क तुटला. घाटकोपरमधले त्यावेळचे स्थानिक गावकरी, पवई इस्टेटच्या मॅनेजरने सर्वप्रथम या अपघाताची माहिती दिली होती.

दुपारी दोनच्या सुमारास पोलिस दुर्घटनास्थळी पोहोचले होते. या विमानातील अमेरिकन पत्रकार महिन्याभराचा इंडोनेशियाचा दौरा आटोपून मायदेशी परतत होते. त्यावेळी इंडोनेशियावर हॉलंडचे राज्य होते. सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकल, द न्यूयॉर्क टाइम्सचे पत्रकार या विमानामध्ये होते.

First Published on June 30, 2018 3:09 pm

Web Title: in 1949 plane crash at ghatkopar
टॅग Plane Crash
Next Stories
1 मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल, तर दत्ता पडसलगीकर पोलीस महासंचालक
2 पुढचा पंतप्रधान कोण ? शरद पवार म्हणाले…
3 भांडूप उड्डाणपूलावर होंडा सिटी कार कंटेनरला धडकली, दोघांचा मृत्यू
Just Now!
X