राज्यात वर्षभरात एकूण १३ वाघ मृत्यूमुखी पडले असून यांपैकी ९ वाघांचा मृत्यू हा नैसर्गिक पद्धतीने झाला आहे. त्यामध्ये ३ बछड्यांचा समावेश आहे तर उर्वरित ४ वाघांपैकी २ वाघांचा मृत्यू वीजेच्या झटक्याने तर इतर २ वाघांचा मृत्यू हा शिकारीमुळे झाला असल्याचे वन विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात सहा महिन्यांत १६ वाघांचा मृत्यू झाला असल्याच्या बातम्या विविध माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर वन विभागाने याविषयी सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. वीजेच्या झटक्याने मृत्यू झालेल्या २ घटनेत नागपूर येथील टेंभुरडोह बिटा येथे वीजेच्या प्रवाह जाणीवपूर्वक सुरु ठेवत एक वाघीण, १ नर सांबर व १ सांबर मादी या तीन वन्‍यप्राण्‍यांची अवैध शिकार करण्‍यात आली होती. तसेच दुसरी घटना ब्रम्‍हपुरी वन विभागात कोथळुना या गावात वजेचा शॉक देऊन एका वाघाची शिकार करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्‍हेही दाखल करण्यात आले आहेत.

वाघांच्या अवशेषांना परदेशी बाजारात मोठी किंमत असल्याने स्थानिकांच्या मदतीने बर्याचदा वाघांसाठी जाळे पसरवून त्यांची शिकार केली जाते. यासाठी अनेक पर्याय वापरण्यात येत असले तरी नैसर्गिक पाणवठ्यावर तृण भक्ष्य प्राण्‍यांची शिकार करण्‍याकरिता पाण्‍यात मोनोक्रोटोफॉस हे किटकनाशक मिसळवून वाघांची शिकार केल्याचे उघड झाल्याचे वनखात्याने स्पष्ट केले आहे. त्यानंतर वाघांची हाडे, नखे, दात व इतर अवशेष काढण्यात आले होते.

सन २०१० ते २०१७ या कालावधीत महाराष्‍ट्रात एकूण ९५ वाघ मृत्‍युमुखी पडले आहेत, त्‍यांपैकी ३१ वाघ शिकारीमुळे मृत्‍युमुखी पडल्याचे वृत्तही होते. मात्र, याचे खंडन करताना सन २०१० ते २०१७ या कालावधीत एकूण ८३ वाघ मृत्‍युमुखी पडले असून त्‍यांपैकी फक्‍त १६ वाघांचा मृत्‍यू शिकारीमुळे झाल्‍याचे चौकशीत निष्‍पन्‍न झाले आहे. तर, उर्वरित ६६ वाघांचा मृत्‍यू हा नैसर्गिक आणि अपघाती पद्धतीने झाल्याचे वनविभागाने सांगितले आहे.

[jwplayer dFM7SvTX]