अनारोग्याच्या भीतीने कर्मचारी धास्तावले; देखभाल विभागाकडून समस्येचा शोध सुरू
मुंबईला मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी कटिबद्ध असलेल्या पालिकेच्या मुख्यालयातच गेल्या दोन दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असून या दूषित पाण्यामुळे पालिका कर्मचारी धास्तावले आहेत. आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून जेवणाच्या डब्यासोबत आता घरून पाण्याची बाटलीही घेऊन यावी का, अशा विचारात कर्मचारी आहेत. दरम्यान, गढूळ पाणीपुरवठा का होत आहे, याचा शोध पालिकेच्या देखभाल विभागाने सुरू केला आहे.
मुंबईमध्ये होणाऱ्या अपुऱ्या अथवा दूषित पाणीपुरवठय़ाबाबत नगरसेवक पालिका सभागृह, स्थायी समितीमध्ये अधूनमधून आवाज उठवत असतात. पण गेल्या दोन दिवसांपासून चक्क पालिका मुख्यालयातच गढूळ पाणीपुरवठा होऊ लागला आहे. स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गढूळ पाणी बाटल्यांमध्ये भरून घेतले आहे.
सुरुवातीला हे पाणी स्वच्छ दिसत असले तरी काही वेळानंतर बाटलीमध्ये तळाला कचऱ्याचा थर साचत असल्याचे निदर्शनास आले आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पुढील आठवडय़ात होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. या संदर्भात पालिकेच्या देखभाल विभागाकडे तक्रारही करण्यात आली आहे. नेमका कुठून गढूळ पाणीपुरवठा होत आहे, याचा शोध सध्या सुरू आहे.
डागडुजीचे कारण
पालिका मुख्यालयाच्या डागडुगीचे काम सध्या सुरू आहे. तळमजल्यावरील भूमिगत पाण्याच्या टाकीचे कामही गेले काही दिवस सुरू होते. त्यामुळे गढूळ पाणीपुरवठा झाला असावा अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. येत्या दोन दिवसांमध्ये पालिका मुख्यालयात स्वच्छ पाणीपुरवठा होईल, असा आशावाद या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.