मुंबईच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण संस्थेच्या पहिल्या पर्वात झालेल्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये तब्बल हजार एक नवोदित पदवीधरांना विविध राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही अभियांत्रिकी, तंत्रज्ञान या क्षेत्रातील कंपन्यांबरोबरच वित्त क्षेत्रातील कंपन्यांचे पहिल्या प्लेसमेंट पर्वात वर्चस्व राहिले. आतापर्यंत २१० कंपन्यांनी ९८६ आयआयटीयन्सना नोकरीच्या संधी देऊ केल्या आहेत. यापैकी ९३ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट पूर्व नोकरीची संधी मिळाली आहे. गेल्या वर्षीही सुमारे हजार एक विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या पहिल्या पर्वात नोकऱ्या मिळाल्या होत्या.
पहिल्या पर्वात ५० हून अधिक अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी साधारणपणे २०० हून अधिक विद्यार्थ्यांना नोकरीची संधी देऊ केली आहे. गेल्या वर्षीही पहिल्या आणि दुसऱ्या पर्वात मिळून ८८ अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी ३८१ विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी देऊ केल्या होत्या. यंदा आयबीएम, गुगल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅक्सेंचर या पहिल्या दोन आठवडय़ात नवपदवीधरांना सर्वाधिक संधी देऊ करणाऱ्या सॉफ्टवेअर कंपन्या ठरल्या आहेत. सुमारे ३५ माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी मिळून आतापर्यंत १५०हून अधिक विद्यार्थ्यांना आपल्याकडे नोकरी करण्याची संधी देऊ केली आहे. या खालोखाल बँकिंग, वित्त सेवा आणि विमा सेवा क्षेत्रातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. या क्षेत्रातील ३० हून अधिक कंपन्या यंदाच्या प्लेसमेंट पर्वात सहभागी झाल्या होत्या. त्यांनीही १५०च्या आसपास विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी दिल्या आहेत. तर डॉशे, गोल्डमन सॅशे, व्हिसा आणि मॉर्गन स्टॅन्ले यांनी प्लेसमेंटचा पहिला दिवस गाजवला. पहिल्याच दिवशी या कंपन्यांनी ३०हून अधिक विद्यार्थ्यांना नोकीरच्या संधी दिल्या. या शिवाय सिटी बँक, डोलाट कॅपिटल, फ्लो ट्रेडर्स, अर्न्‍स्ट अ‍ॅण्ड यंग, अ‍ॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय यांनी पुढील दिवसांमध्ये नोकरीच्या संधी देऊ केल्या. आयआयटीच्या १६ विभागांमधील एकूण १५०० विद्यार्थी दोन्ही पर्वातील प्लेसमेंट प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

आयआयटीच्या पवई येथील संकुलात १ डिसेंबरपासून गेले १५ दिवस सुरू असलेल्या कॅम्पस प्लेसमेंटचा उद्या (बुधवारी) शेवटचा दिवस आहे. ही प्रक्रिया दोन पर्वात राबविली जाते. दोन्ही पर्वासाठी मिळून ४५० कंपन्यांनी आयआयटीच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सहभागी होण्यात उत्साह दाखविला आहे. त्यापैकी २२० कंपन्यांनी पहिल्या पर्वात हजेरी लावून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी देऊ केल्या आहेत.