लालबागमध्ये विसर्जन मिरवणूका सुरु असताना भाविकांच्या किंमती वस्तू मोठया प्रमाणावर चोरीला गेल्याचे समोर आले आहे. लालबागमध्ये चोरटयांनी पुन्हा एकदा भाविकांच्या पाकिट, सोन्याचे दागिने आणि मोबाइलवर डल्ला मारला आहे. लालबाग मार्केटमध्ये असलेल्या पोलीस चौकीबाहेर चोरी झालेल्या वस्तूंची तक्रार नोंदवण्यासाठी मोठी रांग लागली आहे. तक्रार नोंदवण्यासाठी भाविकांना दोन ते तीन तास लागत आहेत.

गर्दीचा फायदा घेऊन चोरटयांनी सोन्याचे दागिने, मोबाइल आणि पाकिटांची मोठया प्रमाणावर चोरी केली आहे. लालबाग-परळ परिसरात मोठी गणेशमंडळे असून दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी लालबागचा राजा, मुंबईचा राजा (गणेश गल्ली), तेजुकाय, नरेपार्क आणि प्रगती सेवा मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी असते. आजही लालबागमध्ये गिरगावच्या दिशेने मार्गस्थ होणाऱ्या गणरायांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.

पाय ठेवायलाही जाग नव्हती. चोरांनी नेमका याच परिस्थितीचा फायदा उचलत डल्ला मारला. लालबागच्या राजाच्या मंडपाबाहेर उभ्या असलेल्या एका माणसाच्या गळयातून सोन साखळी चोरीला गेली. नेमके हे कधी घडले ते त्याला सुद्धा कळले नाही. काही जणांचे नवे कोरे मोबाइल फोन चोरी झाले. एका तक्रारदाराच्या पाकिटातून सात ते आठ हजार रुपये आणि गाडीचे लायन्स चोरीला गेले. चोरी झालेली वस्तू सापडेल याची कुठलीही खात्री नसून वस्तू सापडल्यावर तुम्हाला कळवू ऐवढेच उत्तर पोलिसांकडून देण्यात येत आहे.

गणेशोत्सव सुरु झाल्यापासून पहिल्या चार दिवसातच ‘लालबागचा राजा’ परिसरातील पोलिसांकडे तब्बल १३५ मोबाइल फोन चोरी झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. नवसाला पावणारा गणपती म्हणून ‘लालबागच्या राजा’ची ख्याती आहेत. याच कारणासाठी दरवर्षी राजाच्या दर्शनला भाविकांची मोठी रिघ लागते. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे हात साफ करतात. लालबागचा राजा चिंचपोकळीच्या ब्रिजवर जाईपर्यंत ही गर्दी असते.