जिल्हा प्रशासनाकडून मदतीसाठी नियंत्रण कक्ष

लातूर : लातूर शहरात  गुरुवारी ८०४ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी ४४९ जण म्हणजे  ५५.८४ टक्के करोनाबाधित आहेत. हे प्रमाण धक्कादायक असल्याने काही दिवसापूर्वी सैरभर झालेले प्रशासन दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तयार होत आहे. दरम्यान खाट आणि अन्य आरोग्य सोईंसाठी जिल्हाधिकारी आणि महापालिकेने स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू केले आहेत.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांना रात्री १२.३० वाजता एका रुग्णाच्या नातेवाइकाने शासकीय रुग्णालयात रुग्णाला खाट मिळत नाही, प्राणवायूच्या खाटेची गरज असल्याचा दूरध्वनी केला व पाचच मिनिटात जिल्हाधिकारी दूरध्वनीवर बोलले व संबंधित रुग्णाला रुग्णालयात खाट उपलब्ध झाली.

लातूर महानगरपालिकेच्या वतीनेही करोना मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. एकाच वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात व आता महापालिकेत मदत केंद्र सुरू झाल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.  करोनाचा उद्रेक जिल्ह्य़ात अतिशय वेगाने होतो आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात ९ हजार १८८ जण करोनाबाधित होते. या वर्षी १५ एप्रिलपर्यंतच हा आकडा १६ हजार ७३८ वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्य़ांवरून घसरून आता ७०.७१ टक्के आले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा आकडा आता केवळ २३ दिवसांवर आला आहे. महाराष्ट्रात ४० दिवसांवर, तर देशात ६० दिवसांवर आहे. मृत्युदर देशाचा १.२ असून, महाराष्ट्र व लातूरचा मृत्युदर १.६ आहे. १५ एप्रिल रोजी सायंकाळी आलेल्या आकडेवारीत जिल्ह्य़ात नव्याने १६६३ करोनाबाधितांची भर पडली. आतापर्यंत करोनाबाधितांचा आकडा ५० हजार १९० वर पोहोचला असून ३५ हजार ४९३ जण उपचार घेऊन घरी गेले आहेत, तर १३ हजार ८५८ जण उपचार घेत आहेत.  गुरुवारी आरटीपीसीआर चाचणी केलेल्यांतील ४२ टक्के करोनाबाधित होते, तर प्रतिजन चाचणी केलेल्यांतील २८.६ टक्के करोनाबाधित आढळले. एकूण चाचणीच्या प्रमाणात जिल्ह्य़ात १३.७ टक्के करोनाबाधित आहेत.