माझ्या मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांची कामगिरी उत्तम आहे. थोडफार कमी-जास्त असू शकतं. पण सर्वच मंत्र्यांची कामगिरी उत्कृष्ट आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते एबीपी माझा वृत्तवाहिनीवरील ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात बोलत आहेत.

मंत्रिमंडळात फेरबदल होणार का ? नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का ? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले कि, मंत्रिमंडळातील सहकारी चांगले काम करतायत. त्यापेक्षाही अधिक चांगली कामगिरी करुन दाखवता येऊ शकते. त्यामुळे मंत्रिमंडळात काही फेरबदल होऊ शकतात असे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पण हा विस्तार नेमका कधी होणार हे त्यांनी सांगितले नाही.

आपल्या सरकारच्या चारवर्षांच्या कार्यकाळात चांगल काम झालय असं त्यांनी सांगितलं. पाऊस कमी होऊनही शेतीतल उत्पादन वाढलं आहे असा दावा फडणवीस यांनी केला. ऑनलाइनद्वारे पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न सुरु आहे असे ते म्हणाले. धनगर आरक्षणासाठी प्रयत्न करु तसेच कोर्टात टिकणारे मराठा आरक्षण देऊ असे फडणवीस यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढवली. दूधाचा दर २५ रुपयांवर स्थिर केला या निर्णयांची त्यांनी माहिती दिली. कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होऊ शकत नाही पण कर्जमाफी आवश्यक आहे असे ते म्हणाले. भाजपाचे सरकार येईल असा दावा त्यांनी केला. २०१९ नंतर महाराष्ट्रात रहाणार का ? या प्रश्नावर त्यांनी नक्कीच महाराष्ट्रात राहीन असे उत्तर दिले.