लोअर परळ पुलाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते दादर दरम्यान तब्बल ११ तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. दोन फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी रात्री १० वाजल्यापासून तीन फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजेपर्यंत चर्चगेट ते दादर दरम्यान एकही लोकल धावणार नाही. मेगाब्लॉकच्या या कालावधीत प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी या मार्गावर बेस्टकडून विशेष बस चालवण्यात येणार आहेत.

बेस्टचे प्रवक्ते बी.ए.झोडगे यांनी ही माहिती दिली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बॅकबे आणि वरळी डेपोतून प्रत्येकी तीन-तीन अशा सहा विशेष बसगाडया सोडण्यात येणार आहेत. या बसेस चर्चगेट ते दादर स्थानका दरम्यान धावतील. मरीन लाईन्स, चर्नीरोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, लोअर परेल आणि प्रभादेवी अशा सर्व स्थानकांवर थांबा घेतील.

शनिवारी रात्री ९.३० ते रात्री १.३० वाजेपर्यंत या विशेष बस धावतील. त्यानंतर पहाटे ३.३० ते सकाळी १० वाजेपर्यंत या बसेस धावतील. लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे गर्डर काढण्यासाठी दोन फेब्रुवारीला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ४० टन वजनी दोन क्रेनच्या मदतीने या दिवशी उड्डाणपुलाला नवे गर्डर टाकण्यात येतील. मेगाब्लॉकच्या काळात लोअर परळ ते चर्चगेटदरम्यान एकही लोकल धावणार नाही.