महाराष्ट्रात करोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण मोठया प्रमाणावर आहेत. त्यात मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मिळून ९१ टक्के रुग्ण आहेत. एकटया मुंबईत सर्वाधिक ६१ टक्के रुग्ण आहेत. पुण्यात २० टक्के आणि पालघर जिल्ह्यात १० टक्के रुग्ण आहेत. हे तीन जिल्हे वगळता उर्वरित नऊ टक्के रुग्ण संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तीन वेगवेगळया प्रकारची रुग्णालये असतील. पहिले Covid-19 हेल्थ सेंटर आहे. ज्यात करोनाची लागण झालीय पण लक्षणे दिसत नाहीत अशा रुग्णांना ठेवण्यात येईल. सौम्य लक्षण असलेल्यांना दुसऱ्या रुग्णालयात ठेवण्यात येईल. Covid-19 हॉस्पिटलमध्ये गंभीर तसेच अन्य आजार असलेल्या रुग्णांना ठेवण्यात येईल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

मुंबईत सेव्हन हिल्स हॉस्पिटल्समध्ये कोविड १९ साठी तीनशे बेडस सज्ज आहेत. तिन्ही प्रकारच्या रुग्णांना इथे ठेवता येऊ शकते असे टोपे म्हणाले. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक करोना व्हायरसच्या ३३ हजार चाचण्या करण्यात आल्या. त्यात १६५२ जणांचे नमुने करोना पॉझिटिव्ह मिळाले अशी माहिती टोपे यांनी दिली.