एमबीए झालेल्या तरुणीला नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी जुहू पोलिसांनी दिल्लीच्या रहिवाशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. साहिलसिंह अरोरा असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने पीडित महिलेला खासगी बँकेच्या एचआर खात्यामध्ये नोकरीचे आश्वासन दिले होते. साहिलसिंहने महिलेला मुलाखतीसाठी जुहूच्या हॉटेलमध्ये बोलावले होते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

जुहूच्या हॉटेलमध्ये रुम बुक करण्यासाठी त्याने जी माहिती दिली होती. त्यावरुन साहिलसिंहचा शोध घेतला जात आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी टीम बनवल्या आहेत. तक्रारदार तरुणी मुळची उत्तर प्रदेशची असून मागच्यावर्षी एका खासगी कंपनीत नोकरी मिळाल्यानंतर ती मुंबईत आली होती. ती नवी मुंबईत राहत होती. काही महिन्यांनी तिने नोकरी सोडली व ती पुन्हा आपल्या गावी निघून गेली.

एप्रिल महिन्यात पीडीत तरुणी पुन्हा मुंबईला आली व प्रोफेशनल वेबसाइटच्या माध्यमातून तिने नोकरीचा शोध सुरु केला. जुलै महिन्यात तिला अरोराचा फोन आला. अरोराने त्याचा फोन नंबर त्या मुलीला दिला. एका खासगी बँकेच्या एचआर विभागात नोकरीची संधी असल्याचे सांगितले. आपण बँकेत व्यवस्थापनात उच्चपदावर काम करत असल्याचे त्याने सांगितले. महिना ३० हजार रुपयापर्यंत वेतन मिळेल असा त्याने पीडित तरुणीला शब्द दिला.

“१९ सप्टेंबरला मला अरोराचा फोन आला. त्याने संध्याकाळी जुहूच्या हॉटेलमध्ये मला मुलाखतीसाठी बोलावले. सोबत येताना सर्व कागदपत्रे आणण्यास सांगितली” अशी माहिती पीडित तरुणीने पोलिसांना दिली. मी हॉटेलमधल्या रुममध्ये पोहोचल्यानंतर अरोराने आतून दरवाजा बंद करुन माझ्यावर बलात्कार केला. जेव्हा मी मदतीसाठी आरडाओरडा केला तेव्हा गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी त्याने मला दिली असे पीडित तरुणीने म्हटले आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने पीडित तरुणीला तिथून जाऊ दिले. कुणाकडे याबद्दल वाच्यता केली तर बनवलेला व्हिडिओ तुझ्या वडिलांना पाठवीन अशी धमकी त्याने मुलीला दिली. पण तरुणीने तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम ३७६ (बलात्कार) आणि कलम ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.