मोठ्या संख्येने दलित मतदारांचा भरणा असलेल्या दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात यावेळी दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणा-या दोन नेत्यांमध्ये कडवी टक्कर पाहण्यास मिळणार आहे. यावेळी दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून काँग्रेसकडून विद्यमान खासदार एकनाथ गायकवाड तर शिवसेनेने राहुल शेवाळे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यावेळी सलग तिस-यांदा लोकसभेवर जाण्यास उत्सुक आहेत. तर चेंबूर येथील अणुशक्तीनगर प्रभागाचे नगरसेवक आणि मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असणारे राहुल शेवाळे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात दलित मतदारांचे प्रमाण लक्षणीय असले तरी दोन्ही उमेदवारांपैकी कोणाच्याही अजेंड्यात दलित कार्डाचा समावेश नसणे ही विशेष बाब आहे. परंतु, इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मुद्द्याचा निवडणूक प्रचारात कशाप्रकारे लाभ उठविता येईल यासाठी एकनाथ गायकवाड आणि राहुल शेवाळे या दोघांचा प्रयत्न राहील. अणुशक्ती नगर, चेंबूर, धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा आणि माहिम या विभागांचा समावेश असणा-या या मतदारसंघात मतदारांची संख्या १४.०८ लाख इतकी आहे. त्यापैकी तब्बल २५टक्के म्हणजेच ३.५लाखाच्या आसपास दलित मतदारांचा समावेश आहे. एकनाथ गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी या मतदारसंघात आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि विकासाची कामे केली आहेत. त्यांचे विरोधक राहुल शेवाळे हे फक्त दलित म्हणून जन्माला आले आहेत, आजपर्यंत त्यांनी समाजसेवक किंवा आंबेडकरी विचारांचा पाईक म्हणून काहीच केले नसल्याची टीका एकनाथ गायकवाड यांनी केली आहे. मात्र, इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मुद्दा काँग्रेसने वारंवार राजकारण करून ताटकळत ठेवल्यामुळे एकनाथ गायकवाड यांच्यापासून दलित मतदार दुरावला गेल्याचे राहुल शेवाळेंनी सांगितले आहे.