सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील करोना रुग्णांची एका दिवसांतील संख्या कमी झाली आहे. मंगळवारी १,३२५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २,३५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधीही ७१ दिवसांवर आला आहे.

सप्टेंबरपासून वाढलेली रुग्णांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा वेगही एक टक्कय़ापेक्षा खाली आला आहे. एकूण बाधितांची संख्या २,३२,३९५ वर गेलेली असली तरी त्यापैकी १,९८,१२७ म्हणजेच तब्बल ८५ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या २१,८४१ रुग्ण उपचाराधीन असून उपचाराधीन रुग्णांची संख्याही घटू लागली आहे.

मंगळवारी ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात २८ पुरुष व १० महिला होत्या. गेल्या महिन्याभरापासून दर दिवशी ४० च्या पुढे मृत्यू होत असताना मृतांची संख्याही कमी झाल्यामुळे मृत्यूदर कमी झाला आहे. मृतांची एकूण संख्या आतापर्यंत ९५०४ झाली आहे.

मुंबईतील चाचण्यांची संख्या २० हजारापर्यंत वाढवण्याचे पालिका आयुक्तांनी निर्देश दिलेले असले तरी गेल्या दोन दिवसांपासून फक्त नऊ हजार चाचण्या होत आहेत. त्यामुळेही रुग्णांची एका दिवसातील संख्या कमी नोंदली गेल्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यात आणखी ९५९ करोना रुग्ण

ठाणे : जिल्ह्यत मंगळवारी ९५९ नवे करोनाबाधित रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १ लाख ९३ हजार ९३० इतकी झाली आहे.  दिवसभरात ३९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ४ हजार ९१३ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात महिन्याभराच्या कालावधीनंतर मंगळवारी हजाराहून कमी रुग्ण आढळून आले आहे. या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील २३८, कल्याण-डोंबिवलीतील १९६, नवी मुंबईतील १८८, मीरा-भाईंदरमधील १२४, ठाणे ग्रामीणमधील ९९, अंबरनाथ शहरातील ३१, बदलापूर शहरातील ३०, भिवंडी शहरातील २९ आणि उल्हासनगर शहरातील २४ रुग्णांचा समावेश आहे.