संदीप आचार्य
मुंबई: नायर रुग्णालयातील स्त्रीरोग चिकित्सा विभागात शनिवारी रात्री ११ वाजताही डॉक्टर व्यस्त होते. एका करोना बाधित महिला बाळंतपणासाठी आली होती. डॉक्टरांनी तिची सुखरूप सुटका केली. या महिलेने एका सुंदर बाळाला जन्म दिला होता. नायरमधे हा २०० व्या बाळाचा जन्म होता. तब्बल २०५ करोना मातांनी गेल्या दोन अडीच महिन्यात येथील स्त्रीरोग चिकित्सा विभागात २११ बाळांना जन्म दिला असून सर्व करोना मातांची प्रकृती उत्तम असून जन्माला आलेल्या एकाही बाळाला करोनाची लागण झालेली नाही. ‘आयसीएमआर’ नेही नायर रुग्णालयाच्या या कामगिरीची दखल घेतली असून लवकरच यावर एक शोधनिबंध प्रसिद्ध केला जाणार आहे.

बाळंतपणाची वेळ आली तशी रजनी(नाव बदलून) व तिच्या घरच्यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली पण तिला करोनाची लागण असल्याने अनेक खासगी रुग्णालयांना दाखल करून घेण्यास नकार दिला. अखेर रजनी नायर रुग्णालयात पोहोचली. तेथे स्त्रीरोग विभागात तिला तात्काळ दाखल करून घेऊन सुखरुप सुटका करण्यात आली. “गेल्या अडीच महिन्यात नायरच्या स्त्रीरोग चिकित्सा विभागात बाळंतपणासाठी दाखल झालेल्या बहुतेक महिलांची हीच कहाणी आहे” असे  येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. निरज महाजन यांनी सांगितले.

“एकीकडे करोनाची लागण असलेल्या गर्भवती महिलांवर उपचार करण्याचे तसेच बाळंतपण करण्याची जबाबदारी खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात टाळली जात असताना महापालिकेच्या नायर रुग्णालयात मात्र करोनाबाधित महिलांची सुखरूप सुटका करण्याचे व्रत येथील डॉक्टर व अन्य कर्मचारी प्रामाणिकपणे करत आहेत. आमचे निवासी डॉक्टर हे आमचे खरे हिरो आहेत. यात डॉ. प्रदीप लोखंडे, डॉ. स्नेहल शिंदे, डॉ. भाग्यश्री यवले, डॉ. गीता कुलकर्णी, डॉ. एस. श्रीवास्तव, डॉ. शुभदा भरत, डॉ. भार्गवी, डॉ. प्राजक्ता मोरे, डॉ. प्रियांका जाधव, डॉ. मैत्री आठवले आणि सर्वच निवासी डॉक्टर जी मेहनत करत आहेत त्याला तोड नाही. दिवसरात्र करोनाची तमा न बाळगता ही मंडळी काम करत आहेत ”  असं डॉ. निरज महाजन यांनी सांगितले.

“आमच्या विभागात १२० खाटा असून बाळंतपणासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. नायरचे करोना रुग्णालयात रुपांतर करण्यात आल्यापासून जवळपास ३३० करोना महिला येथे उपचारासाठी दाखल झाल्या असून २०५ महिलांची येथे सुखरुप बाळंतपण पार पडली असून चार महिलांनी जुळ्या मुलांना जन्म दिला तर एका महिलेने तीन बाळांना जन्म दिला आहे. यातील १०० हून अधिक बाळ- बाळंतीण घरी गेल्या असून सध्या १०२ महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत ” असं डॉ. महाजन म्हणाले. आमचे निवासी डॉक्टर तसेच अन्य कर्मचारी पीपीइ किट घालून अहोरात्र सेवा बजावत असून एकाही डॉक्टरला करोनाची आजपर्यंत लागण झाली नसल्याचे डॉ. निरज महाजन यांनी आवर्जून सांगितले.

“करोनाचा उद्रेक सुरु झाल्यापासून नायरमध्ये करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरु झाली. नायरमधील जुन्या इमारतीत असलेला स्त्रीरोग चिकित्सा विभाग नवीन इमारतीत हलविण्यात आला. करोनाच्या गर्भवती माता बाळंतपणासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णालयात येतील हे लक्षात घेऊन या विभागात विशेष सज्जता ठेवण्यात आली. डॉक्टर व कर्मचाऱ्यांपासून संबंधितांना पुरेसे पीपीइ किट पासून आवश्यक ती सर्व तरतूद करण्यात आली आहे” असे नायरचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. करोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयांनी नाकारण्याचे सुरु करताच सावध होऊन आम्ही स्त्रीरोग चिकित्सा विभागात बाळंतपणासाठी येणार्या महिलांची जास्तीतजास्त काळजी घेण्यासाठी सिद्धता केल्याचे डॉ. मोहन जोशी म्हणाले.

नायरमध्ये १४ एप्रिल ते २२ मे या काळात बाळंतपणासाठी १२६ करोनाबाधित महिला दाखल झाल्या होत्या व त्यांनी१२९ बाळांना जन्म दिला. २२ मे ते ३० मे या कालावधी ७९ मातांंनी आपल्या बाळांना जन्म दिल्याचे डॉ. महाजन म्हणाले. आमच्याकडचे काम खूप वाढले असून दिवसातून चार वेळा पीपीइ किट घालून आमचे कर्मचारी स्वच्छता राखण्याचे काम करतात. हे एक मोठे आव्हान असून कपडे धुण्यासाठी आम्हाला शेवटी वॉशिंग मशिन हवे होते. रुग्णालय प्रशासनाला याची कल्पना देताच २४ तासात मशिन मिळाले. महापालिकेच्या रुग्णालयात असेही होऊ शकते यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, असे डॉ. महाजन यांनी मिश्किलपणे सांगितले.

बाळंतपणासाठी दाखल झालेल्या महिलांपैकी ६३ जणांची सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली असून जन्माला आलेल्या सर्व बाळांना आईचे दूध लगेचच सुरु केले असून त्यातूनच या बाळांना खरी प्रतिकारशक्ती मिळणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. करोना मतांसाठी आज नायर रुग्णालय खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरले आहे.