अल्पवयीन मुलीवरील एका बलात्काराच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीची शिक्षा तीन वर्षांनी कमी केली आहे. मुलीची जबानी आणि परिस्थिती या बाबी लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने १० वर्ष कारावासाची शिक्षा कमी करुन सात वर्षांची केली. भांडूप येथे राहणाऱ्या रफिक शेख या युवकाला शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात सत्र न्यायालयाने १० वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनंत बादार यांनी रफिकला बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवले पण १४ वर्षीय पीडित मुलीच्या जबानीनुसार तिचे आरोपीबरोबर प्रेमसंबंध होते ही बाब न्यायालयाने शिक्षा कमी करताना लक्षात घेतली.

मुलीने दाखल केलेल्या एफआयआरनुसार तिचे आरोपीबरोबर प्रेमसंबंध होते. गुन्हा घडला त्यावेळी आरोपी युवक २२ वर्षांचा होता. त्याने मुलीला धमकावल्याचे किंवा तिच्यावर लैंगिक संबंधांसाठी जबरदस्ती केल्याचे कुठेही सिद्ध होत नाही असे न्यायाधीश बादार म्हणाले. परस्पर सहमतीने दोघांचे संबंध होते यात कुठलीही तिळमात्र शंका नाही. सहमतीने संबंध असले तरी हा गुन्हाच आहे कारण मुलीचे वय तेव्हा १६ वर्षापेक्षा कमी होते असे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपी सराईत गुन्हेगार नसल्याचेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले व दहावर्षांची शिक्षा सात वर्षांची करताना १ हजार रुपये दंड ठोठावला.

काय आहे प्रकरण
भांडूप येथे राहणाऱ्या रफिक शेखने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीबरोबर मैत्री केली. पुढे या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. सप्टेंबर २०१२ मध्ये त्याने मुलीला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शरीरीसंबंध ठेवले. रफिकने पुढे लग्नाचे वचन मोडल्यानंतर पीडित मुलीने ऑक्टोंबर २०१२ मध्ये त्याच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. सत्र न्यायालयाने शेखला बलात्कार, फसवणूक केल्या प्रकरणी दोषी ठरवून दहावर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.