घाऊक बाजाराच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट दर

श्रावण महिन्यातील महागाईचे ‘व्रत’ मोडून यंदा घाऊक बाजारात भाज्यांच्या दरांनी स्वस्ताई अंगीकारली असली तरी, किरकोळ बाजारात भाज्यांची चढय़ा दरानेच विक्री सुरू आहे. गेल्या महिनाभरापासून नवी मुंबई तसेच कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात लक्षणीय घसरण झाली आहे. मात्र, दादर, बोरिवलीसह मुंबईतील किरकोळ भाजी मंडयांमध्ये विक्रेत्यांनी दुप्पट-तिप्पट दराने भाज्या विक्रीस मांडल्या आहेत.

चांगल्या पावसामुळे गेला महिनाभर वाशी तसेच कल्याण येथील बाजार समितीत भाज्यांची मोठी आवक होत आहे. एरवी श्रावण महिन्यात पुरवठय़ापेक्षा मागणी अधिक असल्याने भाज्यांचे दर वाढतात. मात्र, यंदा मागणीपेक्षा पुरवठा अधिक होऊ लागल्याने भाज्यांचे दर कोसळले. त्यामुळे यंदाचा श्रावण स्वस्ताईत जाईल, अशी अटकळ होती. मात्र, घाऊक दरातील स्वस्ताई ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याऐवजी किरकोळ विक्रेत्यांनी या संधीचा लाभ घेत नफेखोरी सुरू केली आहे. परिणामी भाज्यांचे दर किरकोळ बाजारात चढेच असल्याचे दिसून येते.

घाऊक बाजारात २२ रुपये किलोने विकली जाणारी मिरची बोरीवलीच्या बाजारात ४८ रुपये तर दादरच्या बाजारात १६० रुपये किलोने विकली जात आहे. वांग्यांचा घाऊक दर १८ रुपये असून किरकोळ दर ४० ते ६० रुपये किलो आहे.  सुरणचा घाऊक दर प्रति किलो १५ रुपये तर दादरच्या किरकोळ बाजारातील दर प्रति किलो ५० रुपये आहे. २० रुपये प्रति किलो असा घाऊक दर असणारा फ्लॉवर बोरिवलीच्या बाजारात तिपटीने तर दादरच्या बाजारात अक्षरश: चौपट किमतीने विकला जात आहे. काकडीचा दर दोन्ही बाजारांत सारखाच असला तरीही तो घाऊक दराच्या दुपटीपेक्षा जास्त आहे.

या दरवाढीला खराब माल आणि अतिरिक्त वजन जबाबदार असल्याचे किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे. ‘घाऊक बाजारातून ६० किलोची पोती घेतली तर त्यातला साधारण १५ ते २० किलो मालच विकण्यायोग्य असतो. बाकीचा माल खराब निघाल्याने फेकून द्यावा लागतो. त्यामुळे  विक्रेत्यांचे नुकसान होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी भाज्या वाढीव दराने विकल्या जातात,’ असे दादरचे किरकोळ भाजीविक्रते प्रमोद गुप्ता यांनी सांगितले. ‘घाऊक बाजारातून फ्लॉवर पानांसहित खरेदी केला जातो. मात्र विकताना तो पाने काढून विकला जातो त्यामुळे किमत वाढते. शिवाय इतर भाज्या विकताना दुकानाचे भाडे, कामगारांचा पगार, नफा इत्यादी गोष्टींचा विचारही करावा लागतो,’ असे बोरिवलीचे किरकोळ विक्रेते उदय गडदे यांचे म्हणणे आहे.