मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने उसळी घेत आहे. शेअर बाजारातील या सकारात्मकतेचा गुंतवणूकदारांना प्रचंड फायदा झाला आहे. अवघ्या पाच सत्रांच्या व्यवहारांमध्ये शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये ४.६७ लाख कोटींनी वाढ झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी पहिल्यांदाच ३७ हजारांचा टप्पा पार करुन ३७ हजार ३३६ अंकांवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील ११ हजार २७८ अंकांवर बंद झाला. ८५ उत्पादनांवरील कर कमी करण्याच्या जीएसटी परिषदेच्या निर्णयाचा शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. २३ जुलैपासून पाच सत्रांच्या व्यवहारांमध्ये मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ८४०.४८ अंकांची वाढ झाली आहे.

शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या भांडवली मुल्यामध्ये १,५१,४४,५४३ कोटींनी वाढ झाली आहे. मागच्या आठवडयात या कंपन्यांचे भांडवली मुल्य १,४६,७७,०२७ कोटी होते. अवघ्या पाच दिवसात या कंपन्यांच्या भांडवली मुल्यामध्ये ४ लाख ६७ हजार ५१५.१६ कोटींनी वाढ झाली आहे.