मुंबई हवामान विभागानं दुपारी दीड वाजता निसर्ग चक्रीवादळाबाबत ताजं बुलेटिन प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये चक्रीवादळ जमिनीला कशा प्रकारे धडकेल याबाबत माहिती देण्यात आली आहे. यानुसार, निसर्ग चक्रीवादळ सध्या अलिबागमध्ये पोहोचलं असून ते पुढील तीन तासात मुंबई, ठाण्याच्या काही भागांना स्पर्शून पुढे जाणार आहे.

चक्रीवादळाबाबत माहिती देताना प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईचे उप महासंचालक कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, ‘हवामान खात्याचं अंदाजानुसार, या चक्रीवादळाचा डोळा सध्या रायगडच्या जवळ असून त्याचा ईशान्य भाग हा रायगडला स्पर्श करुन जात आहे. रायगडला स्पर्शून ते पुढे उत्तरेकडे मुंबई, ठाण्याच्या काही भागांवरुन पुढे जाणार आहे. चक्रीवादळाची जमिनीला धडकण्याची प्रक्रिया येत्या तीन तासात पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या अलिबागला स्पर्श झालेल्या चक्रीवादळाचा वेग हा १२० किमी प्रतितास पेक्षा अधिका आहे.”

दरम्यान, निसर्ग चक्रवादळ कोकण किनारपट्टीला धडकले असून रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळील श्रीवर्धन, दिवेआगारच्या किनारी भागात पोहोचले आहे. या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू ६० किमी प्रतितास वेगाने पुढे सरकत आहे. तर किनारी भागात धडकण्याचा वाऱ्याचा वेग हा १०० किमी प्रतितास आहे. आता हे चक्रीवादळ उरणच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे, अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी हवामान खात्याच्या हवाल्याने दिली आहे.