रस्त्याखालील सांडपाणी वाहिन्यांच्या दुरुस्तीवेळी काँक्रिटचे मोठमोठे पडदे कंत्राटदारांनी आतच विसरल्याने हिंदमाता, परळ, भायखळा परिसर पाण्याखाली गेल्याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात येत असून संबंधित कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना कोटींचा दंड ठोठावण्याची तयारी महानगरपालिका प्रशासनाने केल्याचे समजते.
सोमवारच्या पावसात मुंबईतील हिंदमाता, परळ, भायखळय़ाचा परिसर पाण्याखाली गेला. पावसामुळे नव्हे तर सांडपाणी वाहिन्यांच्या दुरुस्तीवेळी काँक्रिटचे मोठमोठे पडदे कंत्राटदारांनी आतच विसरल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यात अडथळा आल्याने हा प्रकार घडल्याचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत समोर आले होते. या प्रकरणात दोषी कंत्राटदार व पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश कुंटे यांनी दिले होते.
त्यानुसार आता अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली असून कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
तसेच या सांडपाणी वाहिनीच्या दुरुस्तीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यावरही निलंबनाची कारवाई होण्याची चिन्हे आहेत. पालिका आयुक्त सीताराम कुंटे बुधवारी कंत्राटदारांवर ही कारवाईची घोषणा करण्याची शक्यता आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 12, 2013 2:44 am