गेले दहा वर्षांपासून आगरी समाजासह सर्वाच्याच जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या आणि डोंबिवली गावची महाजत्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आगरी महोत्सवाचे रविवार, २ डिसेंबर रोजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते संध्याकाळी पाच वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे.
आगरी युथ फोरमतर्फे आयोजित हा महोत्सव पालिकेच्या डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलात २ ते ९ डिसेंबर या कालावधीत सकाळी नऊ ते रात्री दहा या वेळेत खुला राहणार आहे. आगरी समाज संस्कृतीचे प्रदर्शन, देश-विदेशात विकसित झालेल्या नवनवीन वस्तूंचे स्टॉल्स, त्यांची विक्री या महोत्सवात असणार आहे.
उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपसभापती वसंत डावखरे, पालकमंत्री गणेश नाईक, आदिवासी विकासमंत्री राजेंद्र गावित, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर, महोत्सवाचे अध्यक्ष गुलाब वझे, महापौर वैजयंती गुजर उपस्थित राहणार आहेत.
देश-विदेशात विखुरलेल्या आगरी समाजाला एका व्यासपीठावर आणणे. त्यांना आपल्या समाजसंस्कृतीचे दर्शन घडविणे हादेखील या महोत्सवामागील उद्देश आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. या महोत्सवाला सुमारे तीन ते चार लाख नागरिक भेट देतील, असे आयोजकांनी सांगितले.