महाराष्ट्रात सध्या हाय व्होल्टेज राजकीय नाट्य सुरू आहे. अशातच आयकर विभागानं शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या दोन ठेकेदारांवर कारवाई केली आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी काम करणाऱ्या तीन व्यावसायिक समूहांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत नागरी संस्था आहे.

आतापर्यंत बोगस खर्च आणि भांडवली शेअर्सच्या प्रीमियमद्वारे भांडवली हस्तांतरणाच्या स्वरूपात २७५ कोटी रूपयांपेक्षा अधिक तफावत असल्याची माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे. राज्यात सध्या राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. भाजपा आणि शिवसेनेमधूल मतभेद वाढत असतानाच हे छापे टाकण्यात आले आहेत. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत आयकर विभागाद्वारे छापे टाकण्याचं काम सुरू होतं. दरम्यान, ही रक्कम ३०० कोटी रूपयांच्या जवळपास जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केवळ विस्तृत तपासणी आणि पैशाचा माग काढणे अंतिम लाभार्थी दर्शवेल. या टाकण्यात आलेल्या छाप्यांना काही जण राजकीय रंगही देऊ शकतात. यासाठीच आय-टी विभागाने आपला मुद्दा प्रस्थापित करण्यासाठी कसून प्रयत्न केले पाहिजेत, असे वरिष्ठ चार्टर्ड अकाऊंटंटने सांगितलं. काळं धन पांढरं करण्यासाठी उत्सुक असलेल्या पक्षांसाठी गेल्या काही वेळापासून एक कार्यप्रणाली आहे. रोख रकमेमध्ये रस असलेल्यासाठी रोख रक्कम निर्माण करण्याचं साधन म्हणूनही याकडे पाहिलं जातं. आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यांमध्ये 275 कोटी रूपयांपेक्षा अधिक तफावत असल्याचं समोर आलं आहे.