31 March 2020

News Flash

नवउद्य‘मी’ : करप्रणालीचा तंत्रज्ञानी चेहरा

यम, जलद सेवा आणि ग्राहकांचा विश्वास हेच या यशाचे गमक असल्याचे अर्चित सांगतो.

 

वस्तू व सेवा कर लागू झाल्यामुळे नेमका आपल्या जीवनात काय फरक पडणार आहे? कोणत्या वस्तू महागणार तर कोणत्या स्वस्त होणार? असे एक ना अनेक प्रश्न सामान्यांना पडले आहेत. पण या चर्चेत दरवर्षी याच काळात सुरू असलेल्या प्राप्तिकर विवरणपत्राची तयारी मात्र झाकोळली गेली आहे. तंत्रज्ञानाच्या विविध पर्यायांमुळे प्राप्तिकर विवरणपत्र भरणे अधिक सुलभ झाले आहे. ही प्रक्रिया सुलभ करणाऱ्या क्लिअर टॅक्सचा संस्थापक अर्चित गुप्ता याची यशोगाथा.

प्राप्तिकर विवरणपत्र भरायचा दिवस आला की, अनेकांच्या कपाळाला आठय़ा यायच्या. ही प्रक्रिया पूर्ण करायची म्हणजे सनदी लेखापालांना किमान एक हजार रुपयांची दक्षिणा देणे क्रमप्राप्तच. यामुळे अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात. पण ज्या वेळेस गृहकर्ज अथवा अन्य कर्जाची आवश्यकता असते त्या वेळेस या विवरणपत्रांचा आधार महत्त्वाचा ठरतो. मग आयत्यावेळी अनेकांची धावपळ सुरू होते. प्रत्यक्षात अगदी सोपी असलेली ही प्रक्रिया एखादा पदवीधर व्यक्ती स्वत:हून करू शकतो. मात्र यासाठी प्रत्येक जण सनदी लेखापालांकडेच धाव घेतो. हे कुठेतरी थांबवण्यासाठी व जास्तीत जास्त लोकांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरावे या उद्देशाने २०११ मध्ये अर्चित गुप्ता याने क्लिअर टॅक्सची स्थापना केली. अवघ्या एक हजार ग्राहकांपासून सुरू झालेला हा व्यवसाय इतका वाढला आहे की, गेल्या वर्षी या संकेतस्थळाच्या माध्यमातून तब्बल साडेनऊ लाख प्राप्तिकर विवरणपत्रे सादर करण्यात आली. संयम, जलद सेवा आणि ग्राहकांचा विश्वास हेच या यशाचे गमक असल्याचे अर्चित सांगतो.

कोडिंगमध्ये रमलेला अर्चित परदेशात नोकरीला होता. पण त्याला आपल्या देशातील नागरिकांसाठी काहीतरी करायचे होते आणि स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा होता. मूळचा दिल्लीचा असलेल्या अर्चितचे वडील हे व्यवसायाने सनदी लेखापाल होते. ते कर क्षेत्रातील अनेक अडचणींबाबत त्याच्याशी संवाद साधत असे. नोकरदारवर्गाचे विवरणपत्र भरणे ही अगदी सोपी प्रक्रिया आहे मात्र त्यासाठीही ते आमच्याकडे येतात. सर्वानाच सनदी लेखापालांचे शुल्क परवडतेच असे नाही. मग अनेक जण विवरणपत्र भरण्याचे टाळतात. यामुळे देशाचे मोठे नुकसान होते. याचबरोबर बहुतांश लोक कर व्यवस्थेपासून दूर राहतात असे त्याच्या वडिलांली सांगितले. मग त्याने यावर तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने काही तोडगा निघेल का यावर विचार सुरू केला व वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कर विवरणपत्र भरण्याचे कोडिंग पूर्ण केले. हे काम यशस्वी झाल्यानंतर त्याने ‘क्लिअर टॅक्स’ नावाने संकेतस्थळ सुरू केले. या संकेतस्थळावर नोकरदाराने केवळ ‘फॉर्म १६ अ’ अद्ययावत केला की त्याचे विवरणपत्र भरून तयार होते. अवघ्या काही क्लिकवर होणारे हे काम त्या काळातील तंत्रस्नेहींच्या पसंतीस उतरले व पहिल्याच वर्षी त्याने एक हजार ग्राहकांची मने जिंकली. ही सेवा पूर्णपणे मोफत देण्याचे त्याने ठरविले. पुढे या प्रवासात अनेक आव्हाने येत होती. ती पार करत अर्चितने व्यावसायिकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली. ग्राहकांचा विश्वास व त्यातून होणाऱ्या प्रसिद्धीमुळे कोणत्याही प्रकारचे ब्रँडिंग न करता हे संकेतस्थळ सामान्यांपर्यंत पोहोचले व गेल्या आर्थिक वर्षांत संकेतस्थळावरून तब्बल साडेनऊ लाख विवरणपत्र सादर झाल्याचे तो अभिमानाने सांगतो. पण हे तितकेच पुरेसे नसून त्याने या आर्थिक वर्षांत २० लाख विवरणपत्र सादर होण्याचे उद्दिष्टय़ समोर ठेवले आहे.

उद्योगाला उभारी देण्यासाठी आर्थिक पाठबळ व चांगला चमू मिळणे आवश्यक असते. अर्चित या शोधात असताना ‘पेटीएम’ने आयोजित केलेल्या एका हॅकेथॉनमध्ये त्याचा परिचय अंकित सोळंकी व श्री वत्सांक यांच्याशी झाला व त्यांची काम करण्याची पद्धत लक्षात घेऊन त्याने त्या दोघांना आपल्या व्यवसायात सहसंस्थापक करून घेतले. व्यवसायाची प्रगती चांगली होत होती, मात्र आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. ही धडपड सुरू असतानाच ‘वायसी’ या जागतिक स्तरावरील बडय़ा निधी उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीकडे त्यांनी अर्ज केला. त्यांची संकल्पना आवडल्यामुळे कंपनीने ४५२ दिवस त्यांना सॅनफ्रॅन्सिस्को येथे विशेष प्रशिक्षण देऊन निधी उपलब्ध करून दिला. या काळात अनेकांच्या भेटी झाल्या व खूप काही नवीन शिकायला मिळाले असे अर्चित सांगतो. पेटीएमचे विजयशेखर शर्मा यांनी अर्चितला आर्थिक पाठबळ तर दिलेच शिवाय त्यांच्या बेंगळूरु कार्यालयात अर्चितचे कार्यालय सुरू करण्यासाठी जागाही उपलब्ध करून दिली. आता मात्र अर्चितचे बेंगळूरु येथे स्वत:चे कार्यालय असून ४००हून अधिक जण काम करत आहेत.

सध्या देशात वाहत असलेल्या वस्तू व सेवा कराच्या लाटेवर स्वार होण्यासाठीही अर्चित सज्ज झाला आहे. यासाठी त्यांनी कोडिंग करून व्यापाऱ्यांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. व्यापाऱ्यांना या कराविषयी ज्ञान व्हावे यासाठी त्यांनी देशभरात १०० ठिकाणी कार्यशाळा आयोजित केल्या व ‘वेबिनार्स’ही (ऑनलाइन शिबिरे) आयोजित केले. नवीन करप्रणालीत बिल तयार करण्यापासून विवरणपत्र भरण्यापर्यंत अनेक गोष्टी त्याने उपलब्ध करून दिल्या आहेत. इतर संकेतस्थळांबरोबर स्पर्धा असण्याचा प्रश्नच नसल्याचे अर्चित सांगतो. आम्ही सरकारसोबत काम करत असल्यामुळे सरकारी संकेतस्थळाशी आमची स्पर्धाच नसल्याचे अर्चित सांगतो. या संकेतस्थळावर वापरकर्त्यांला विविध प्रकारच्या विवरणपत्रांमधून पाहिजे ते विवरणपत्र निवडण्यापासून अनेक तपशील स्वत: भरावा लागतो. मात्र आमच्या संकेतस्थळावर अवघ्या काही क्लिकवर हे काम होते. यामुळे या ठिकाणी जाऊन विवरणपत्र भरणे वापरकर्त्यांला सोपे वाटते, असे तो म्हणाला.

‘नोकरदार वर्गात सुमारे ९५ टक्के लोक हे मोफत सेवेचा लाभ घेतात, पण काहींच्या विवरणपत्रात काही क्लिष्टता असते. त्यांना दोन विविध ठिकाणांहून उत्पन्न होत असते. अशा वेळी विवरणपत्र कोणते भरायचे, दोन्ही उत्पन्न एकत्रित कसे करायचे, असे अनेक प्रश्न त्यांना पडलेले असतात. अशा लोकांना आमच्या सनदी लेखापालांकडून मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. यासाठी पैसे आकारले जातात, तर व्यावसायिकांसाठीही अनेक सेवा देण्यासाठी पैसे आकारले जातात. अनेकदा ग्राहकांना गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो. त्यानुसार जर ग्राहाकांनी गुंतवणूक केली तर गुंतवणूक झालेली कंपनी आम्हाला काही मोबदला देते. अशा विविध स्तरांवरून उत्पन्न मिळते,’ असे अर्चित म्हणाला. कोणताही व्यवसाय सुरू करताना भविष्यातील फायद्याचा विचार करून त्याची आखणी करायची असते. तसे केले तर तुम्हाला यश हमखास मिळते. मात्र हे करत असताना तुमच्यात कमालीचा संयम असायला हवा. तसेच आपल्या सेवेमुळे ग्राहकांचे समाधान कसे होईल याचाही विचार करणे आवश्यक आहे. ग्राहक समाधान हे प्रमुख्य उद्दिष्टय़ ठेवले तर तुमचा प्रवास अधिक सुखकर होऊ शकतो, हा अर्चितचा नवउद्यमींना सल्ला आहे.

Niraj.pandit@expressindia.coms

@nirajcpandit

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2017 2:47 am

Web Title: income tax returns clear tax e filing website
Next Stories
1 नामवंतांचे बुकशेल्फ : पुस्तकं – कुटुंबातील एक घटकच जणू..
2 राज्यपालांना प्रतिवादी करता येऊ शकते का?
3 वस्तू-सेवाकराची अंमलबजावणी व्यवस्थेपुढील अडसर ठरेल!
Just Now!
X