महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वाजतगाजत लोकार्पण करण्यात आलेल्या पश्चिम रेल्वे मार्गावरील ‘राम मंदिर’ रेल्वे स्थानकावर मुलभूत सुविधांची वानवा असल्याने प्रवाशांच्या हालात भर पडली आहे. स्थानकात पूर्णवेळ स्टेशनमास्तर, हमाल, खानपान सेवा, सुरक्षा व्यवस्था, रुग्णवाहिका नसल्याने प्रवाशांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

राजकीय श्रेयासाठी घाईघाईत राममंदिर स्थानकाचा शुभारंभ करण्यात आला; मात्र एकाही लोकप्रतिनिधींने स्थानकातील सुविधांकडे लक्ष दिलेले नाही. स्थानकावर १०८ क्रमांकाची रुग्णवाहिकेचा अद्याप पत्ता नाही. संभाव्य दुर्घटनेतील जखमींना प्रथमोपचार मिळवून देण्यासाठी नेमकी कोणाची मदत घ्यायची याची माहिती प्रवाशांना नसल्यान अडचणी वाढल्या आहेत. यासाठी गोरेगाव स्थानकातील रुग्णवाहिका हमालांना बोलावण्याची वेळ येत आहे. स्थानकमास्तर नसल्याने स्थानकातील सुविधांविषयी तक्रार नेमकी कोणाकडे करायची याविषयी प्रवाशांना कल्पना नसल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

राम मंदिर स्थानक बऱ्यापैकी उंच ठिकाणी आहे. त्यामुळे स्थानकावर येण्याकरिता बऱ्याच पायऱ्या चढून यावे लागते. शिवाय तिकीटघरही  स्थानकावर बांधण्यात आलेल्या पुलावर आहे. स्थानक नव्याने बांधूनही येथे सरकत्या जिन्यांची सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे वृद्धांना तिकीट काढण्यासाठी चढउतार करावे लागते. रेल्वे स्थानकावर काही अनुचित प्रकार घडल्यास स्टेशन मास्तर व रेल्वे पोलीस सेवेसाठी उपलब्ध असतात.

स्थानकावर रेल्वे पोलीसही देण्यात आलेले नाहीत. रात्रपाळीसाठी स्टेशन मास्तर पुरवण्यात आले नसल्यामुळे रात्रीच्यावेळेस स्टेशन मास्तरची खोली बंद असते. त्यामुळे तेथे काही दुर्घटना घडल्यास दुसऱ्या स्थानकातून मदत मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डेव्हीड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.