अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवा,  पाळणाघर, शौचालये यांची वानवा

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदान केंद्रांवर विविध सोयीसुविधा पुरवण्याच्या घोषणा करणाऱ्या निवडणूक यंत्रणेचे दावे प्रत्यक्षात खोटे ठरल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. मुंबईतील अनेक मतदान केंद्रांवर वैद्यकीय सेवा, पाळणाघरापासून शौचालयापर्यंतच्या सुविधा नसल्याने मतदारांची गैरसोय झालीच; पण त्याहीपेक्षा निवडणूक कर्मचाऱ्यांना या असुविधांचा अधिक फटका बसला.

मतदारांसाठी पिण्याच्या पाण्यासह विद्युतपुरवठा, शौचालय, अपंगांसाठी रॅम्पची व्यवस्था सर्व मतदान केंद्रावर केल्याचा निवडणूक आयोगाने केलेला दावा फोल ठरला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि अपंग मतदारांच्या सोईसाठी अनेक केंद्र तळमजल्यावर स्थलांतरित केल्याने मैदानांमध्ये उभारली होती. या ठिकाणी शौचालयाची सुविधा करण्यासाठी प्लास्टिकची तात्पुरती शौचालये आयोगाने उभारली असली तरी त्यांची अवस्था बिकट होती. भायखळ्याच्या दगडी चाळजवळील मतदान केंद्रावरील शौचालयाला कडीच नसल्याने महिलांची अडचण झाली. त्यामुळे या ठिकाणी जाताना महिला कर्मचाऱ्यांना अन्य एका महिला कर्मचाऱ्याला सोबत घेऊन जावे लागत होते. त्यामुळे या ठिकाणी थोडा वेळ मतदान थांबवण्याचीही वेळ आली. जोडून असलेल्या या शौचालयांमध्ये एकजण गेल्यानंतर हलत असल्याने दुसऱ्या शौचालयात जाणे शक्यच नाही, अशी शौचालयाची दुर्दशा असल्याचे तिथल्या निवडणूक कर्मचाऱ्याने सांगितले.

वांद्रे पूर्वच्या नवजीवन विद्यामंदिर मतदान केंद्रावर सकाळी मतदानासाठी गेलेल्या नागरिकांना तेथील अस्वच्छ शौचालयांमुळे नाकाला रुमाल लावतच मतदान करावे लागले. माध्यमांकडे याची तक्रार करणार असे मतदारांनी सांगितल्यानंतर ‘तुम्हीच आमची अवस्था बघा’ अशी कैफियत तिथल्या कर्मचाऱ्यांनी मतदारांपुढे मांडली. अखेर उद्धव ठाकरे येथे मतदान करायला येणार असल्याने काही तासांतच पाणी टाकून स्वच्छता करण्यात आली.

पाळणाघर नावापुरतेच!

आग्रीपाडा पालिका शाळेतील मतदान केंद्राचा काही भाग खुल्या मैदानावर उभारलेला होता. खुल्या मैदानात अनेक मतदान केंद्रे असल्याने पाळणाघरासाठी नेमण्यात आलेल्या अंगणवाडी सेविकेला बसण्यासाठी जागाच उपलब्ध नव्हती. उघडय़ा मैदानावर खुर्ची टाकून बसलेली महिला आणि तिच्याकडे एक खुळखुळा आणि बॉल अशी पाळणाघराची अवस्था होती. बोरिवली (पूर्व) येथील चोगले हायस्कूलमध्ये मतदान केंद्र असूनही पाळणाघराची सोय मात्र मैदानात केली होती. पावसामुळे मैदानात चिखल झाल्याने मुलांना त्या ठिकाणी उभेही राहणे शक्य होत नव्हते. कांदिवली पूर्व येथील आकुर्ली पालिकेच्या शाळेत पाळणाघराच्या नावाखाली फक्त एक बाकडे होते.