मध्य रेल्वे मार्गावर वाढणाऱ्या प्रवासी संख्येमुळे लोकल फेऱ्यांत टप्प्याटप्यात वाढ करण्यात आली असली तरी मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल गाडय़ांना ठरावीक स्थानकांवरच थांबे दिले जात असल्याने मधल्या स्थानकांवरील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. रेल्वे स्थानक जवळ असूनही केवळ थांबा नाही म्हणून वाहतुकीसाठी दुसरा पर्याय निवडत वा पायपीट करत कार्यालय अथवा घर गाठावे लागत आहे.

१५ जूनपासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या २०० लोकल फे ऱ्यांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येत आहे. जुलै महिन्यात १५० फेऱ्यांची भर पडली. सध्या मध्य रेल्वेवर ४२३ फे ऱ्या चालवण्यात येत आहेत. १ ऑक्टोबरपासून आठ फेऱ्यांची भर पडली. यामध्ये ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवर ४, सीएसएमटी ते कल्याण मार्गावर सर्व अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी दोन आणि फक्त महिलांसाठी दोन फेऱ्यांचा समावेश आहे. परंतु, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण आणि त्यापुढे तर हार्बरवर सीएसएमटी ते पनवेल आणि ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी, पनवेलपर्यंत जलद लोकल चालवण्यात येत आहेत. त्यामुळे या गाडय़ांना मोजक्याच स्थानकात थांबे देण्यात आले आहेत. त्यात प्रवाशांची मोठी गैरसोय होते.

ज्या स्थानकात लोकल थांबत नाहीत, तेथील प्रवाशांना जवळच्या स्थानकात लोकल पकडण्यासाठी बरीच धडपड करावी लागते. अन्यथा बेस्ट, एसटी पकडून कार्यालय, घर गाठावे लागत आहे. गाडय़ांना गर्दी होऊ नये म्हणून थांबे कमी दिले जातात, असे रेल्वेचे उत्तर आहे. परंतु त्यात प्रवाशांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी राज्य शासनाच्या समन्वयाने लोकल गाडय़ांना थांबे देण्यात आल्याचे सांगितले. सध्या त्यात वाढ करण्यासंदर्भात शासनाकडून रेल्वेला कोणतीही सूचना आली नसल्याची माहिती दिली.

या स्थानकांतच थांबा

सध्या सीएसएमटी, दादर, भायखळा, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, नेरळ, आसनगाव, पनवेल, मानखुर्द, वडाळा, रबाळे, कोपरखैरणे, तुर्भे, जुईनगर, नेरुळ, बेलापूर, वाशी, पनवेल या स्थानकांतच लोकल गाडय़ांना थांबा दिला जातो.

मध्य रेल्वेने धिम्या लोकल चालवणे गरजेचे आहे. अन्य स्थानकातील अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना लोकल गाडय़ांचा काहीच फायदा नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोयच आहे. परिणामी या कर्मचाऱ्यांना कार्यालय गाठण्यासाठी बसचा पर्याय निवडावा लागतो किं वा रिक्षाने जवळचे स्थानक गाठावे लागत आहे.

– नंदकु मार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था