आढावा बैठकीत शिवसेना नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : करोना विषाणूच्या संसर्गामुळे अनेक विभागांतील नागरिक त्रस्त आहेत. प्रभागातील मतदार आपापल्या समस्या वारंवार मांडत आहेत, परंतु निधीअभावी त्यांना मदत करता येत नाही. त्यामुळे करोनाविषयक कामासाठी नगरसेवक निधी वाढवून द्यावा अथवा नगरसेवकांच्या संमतीने निधी खर्च करण्याची मुभा द्यावी, असे गाऱ्हाणे शिवसेना नगरसेवकांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत मांडले.

करोना विषाणूचा संसर्ग मुंबईत सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना नगरसेवकांशी संवाद साधता आला नव्हता. उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेनेच्या नगरसेवकांशी संवाद साधला. प्रभागात सुरू असलेल्या नागरी कामांची स्थिती, पाणीपुरवठा, साफसफाई, करोना काळजी केंद्रांतील सुविधा आदींबाबत संबंधित नगरसेवकांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. सुविधांमधील कमतरतेबाबतही त्यांनी आढावा घेतला.

प्रभागातील नागरिक सातत्याने मदतीसाठी आपल्याकडे धाव घेत आहेत. मात्र निधीअभावी त्यांना मदत करता येत नाही. पालिकेने १५ लाख रुपये नगरसेवक निधीतून खर्च करण्याची परवानगी दिली होती, मात्र हा निधी संपला आहे. नागरिकांना मदत करण्यासाठी आणखी निधीची गरज आहे. त्यामुळे करोना काळात नागरिकांना मदत करण्यासाठी आणखी नगरसेवक निधी उपलब्ध करावा किंवा नगरसेवकांच्या संमतीने निधी खर्च करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी बहुसंख्य नगरसेवकांनी बैठकीत केली.

गणेश विसर्जनानिमित्त होणारी गर्दी टाळणे गरजेचे आहे. त्यासाठी उपाययोजना म्हणून भाविकांकडून त्यांच्या इमारतीखालीच गणेशमूर्ती स्वीकारावी आणि त्याचे विसर्जन करावे. त्यामुळे विसर्जनस्थळी गर्दी होणार नाही, असा मुद्दाही नगरसेवकांनी उपस्थित केला.