बारावी विज्ञान शाखेचा निकाल वाढल्यामुळे यंदा प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेश यादीतील पात्रता गुण (कट ऑफ) साधारण दीड ते दोन टक्क्यांनी वाढले आहेत. विद्यार्थ्यांचे प्राधान्य नव्याने सुरू झालेले अभ्यासक्रम, स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रम, नव्या शाखांना असल्याचे दिसत आहे. वाणिज्य महाविद्यालयांतील प्रवेश पात्रता गुण साधारण गेल्यावर्षीप्रमाणेच आहेत.

मुंबई विद्यापीठाशी संलग्न सुमारे ७०० हून अधिक महाविद्यालयांतील प्रथम वर्ष पदवीच्या बीए, बीकॉम, बीएस्सी, बीएएफ, बीएमएम आदी अनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांची पहिली प्रवेश यादी महाविद्यालयांनी गुरूवारी जाहीर केली. बारावीचा निकाल यंदा साधारण पाच टक्क्यांनी वाढला. विशेष प्राविण्य, त्यातही ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली. त्याचबरोबर सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय शिक्षण मंडळाचे विद्यार्थीही पदवीकरिता मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात प्रवेशासाठी येतात. या मंडळांचा निकालही यंदा ९० टक्क्यांच्या पुढे आहे. त्यामुळे यंदा महाविद्यालयांचे पहिल्या यादीतील कट ऑफ गुण वाढल्याचे दिसत आहे.

वाणिज्य शाखेच्या कट ऑफ गुणांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. वाणिज्य शाखेचा बारावीचा निकालही यंदा साधारण गेल्यावर्षीप्रमाणेच होता. वाणिज्य शाखेतील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये नव्याने सुरू झालेले विषय, व्यावसायिक विषयांचे अभ्यासक्रम, स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्राधान्य आहे. कला शाखेकडेही विद्यार्थ्यांचा ओढा गेल्या काही वर्षांपासून वाढला आहे. बहुतेक नामवंत महाविद्यालयांचे कला शाखेतील प्रवेशासाठीचे पात्रता गुण ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक आहेत.

अभ्यासक्रम…….२०२० २०१९

नरसी मूनजी महाविद्यालय

बीकॉम………..९४.३३…   ९३.३३

बीएफएम………९५.२….९४.८३

बीएएफ………. ९६.२….९५.८

बीएमएस(कॉमर्स)….९६.२….९६

बीएमएस (विज्ञान)….९१.८…..९२.६

बीएमएस (कला)…..९३.८…..९१.४

एचआर

बीकॉम……….९५    ९६

बीएफएम………९४       ९४

बीएएफ……….९५ ९४.३०

बीएमएम(कॉमर्स)….९१.०८    ९३.२०

बीएमएम (विज्ञान)…..८८.२०  ९२

बीएमएम (कला)……९४.२०    ९४.२०

बीएमएस(कॉमर्स)…..९६      ९५.६०

बीएमएस (विज्ञान)…. ९१.२०  ९१.४०

बीएमएस (कला)…..९१.४० ९०.४०

मिठीबाई

बीएफएम………९४.२०…९४

बीएएफ……….९५……९५.२०

बीएमएस(कॉमर्स)…९५.६० …९५.६०

बीएमएस (विज्ञान)…९१.५०…९१.६७

बीएमएस (कला)….९०.३१ …९१.१७

बीएमएम(कॉमर्स)…९३.८० ९३.४०

बीएमएम (विज्ञान)…९१.६० ९२.१७

बीएमएम (कला)…९५ ९४.६७

रूईया

बीए………९५.६…९५.८

बीएस्सी…… ८७.०८ ….८६.३१

झेवियर्स

बीए (एचएससी)….९२ ९२.३१

बीए (इतर बोर्ड)….९८.६०  ९८.४२

बीएससी (आयटी)..९४

के. जे. सोमय्या कला, वाणिज्य महाविद्यालय

कला……..  ८८.२०  ८०.२०

वाणिज्य…… ८८.२०  ८६.६२

म. ल. डहाणूकर महाविद्यालय

बीकॉम………..८४.४६ …८४.४६

बीएफएम………७७.२३…..७२

बीएएफ……….८४.१५ ८२.६२

पोद्दार महाविद्यालय

बीकॉम……  ९४  …९३.३८

वझे-केळकर महाविद्यालय

बीकॉम………..८९ …८९.२३

बीएससी………  ७५.२३

बीए ……….    ९०.८३

केसी महाविद्यालय

बीकॉम……. ९३ ९२

बीएससी (पर्यावरण, सांख्यिकी, गणित) ८० ७४.१५

बीए ………. ८० ९३

११ ऑगस्टपर्यंत प्रवेशनिश्चिती

या यादीतील विद्यार्थ्यांना मंगळवारी (११ ऑगस्ट) दुपारी ३ वाजेपर्यंत आपले प्रवेश संबंधित महाविद्यालयात निश्चित करायचे आहेत. त्यानंतर दुसरी यादी ११ ऑगस्टला सायंकाळी ७ वा. जाहीर करण्यात येईल.

कट ऑफ गुणवाढ कशामुळे?

विज्ञान शाखेचा निकाल यंदा अधिक वाढला. त्याचप्रमाणे वैद्यकीय अभ्यासक्रमासह अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तूकला या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा झालेल्या नाहीत. प्रवेश परीक्षा कधी होणार याबाबतही संदिग्धता आहे. त्यामुळे यंदा विज्ञान शाखेच्या पात्रता गुणांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: मूलभूत विज्ञान विषयांपेक्षा संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असल्याचे दिसते.