स्थापत्य अभियंत्याला मारहाणीचा आरोप :

स्थापत्य अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा, तसेच घटना घडली त्या वेळी त्यांच्या बंगल्यावर तैनात पोलिसांचा गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासूनचा संपर्क  तपशील नोंद (सीडीआर) आणि ग्राहक तपशील नोंद (एसडीआर) मिळवण्याचे व जपून ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी ठाणे पोलिसांना दिले.

गेल्या वर्षी ८ एप्रिलला आव्हाड यांच्या ठाणे येथील बंगल्यावर त्यांच्या समर्थकांनी मारहाण केली होती. आव्हाड यांच्या उपस्थितीत ही मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी आव्हाड यांना आरोपी केलेले नाही. त्यामुळे आव्हाड यांना आरोपी करण्याचे आदेश देण्याची आणि प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याची मागणी स्थापत्य अभियंता अनंत करमुसे यांनी याचिकेद्वारे केली आहे.

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर बुधवारी याप्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी युक्तिवाद करताना मारहाणीच्या घटनेला ८ एप्रिलला एक वर्ष पूर्ण होईल. त्यामुळे मारहाण झाल्याचा पुरावा असलेला सीडीआर आणि एसडीआर आपोआप नष्ट होईल. पोलिसांनी तो मिळवून जपून ठेवण्याची गरज आहे, असे याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड्. आबाद पोंडा यांनी न्यायालयाला सांगितले. तर याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली.