लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : करोना टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा पूर्णपणे सुरू झाली नसताना प्रवासाचे महत्त्वाचे साधन बनलेल्या ‘बेस्ट’ची प्रवासीसंख्या २३ लाखांवर पोहोचली आहे. टाळेबंदीपूर्वीपर्यंत ‘बेस्ट’मधून ३० लाखांच्या आसपास प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे प्रवासीसंख्या आणखी वाढवण्यासाठी ‘बेस्ट’ उपक्रमाने यंदा कोणतीही भाडेवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.

टाळेबंदीपूर्वी म्हणजे ९ मार्च २०२० ला बेस्टची प्रवासी संख्या ३० लाख ८८ हजार ८३४ होती. १६ मार्चला ती २८ लाखांवर घसरली. परंतु २० नोव्हेंबरला तब्बल २२ लाख ४७ हजार ५४२ प्रवाशांनी बेस्टने प्रवास के ला. त्यांच्याकडून बेस्टला २ कोटी ३ लाख ३९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. भाडेवाढ केल्यास प्रवासी पुन्हा बेस्टकडे पाठ फिरवतील अशी भीती असल्याने भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे बेस्ट समितीच्या बैठकीत महाव्यवस्थापकांकडून स्पष्ट करण्यात आले.

बेस्ट उपक्रमाच्या २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात परिवहनला १,४०७ कोटी रुपयांचे उत्पन्न आणि ३,०३१.२४ कोटी रुपये खर्च अंदाजित केला आहे. यामुळे परिवहन विभागाला १,६२४.२४ कोटी रुपयांची तूट आली आहे. गेली अनेक वर्षे बेस्टचा परिवहन विभाग तोटय़ातच आहे. त्यामुळे बेस्टला फायद्यात आणण्यासाठी अनेक सूचना शिवसेना, काँग्रेस, भाजप सदस्यांनी केल्या. यावेळी काही सदस्यांनी बेस्टचे भाडे कमी केल्याने उत्पन्न कमी झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे बेस्ट भाडेदराचा पुनर्विचार विचार करण्याची मागणी के ली. तसेच मेट्रो-४ सारखी सेवाही येणार असून बेस्ट उपक्रमाने आपल्या ताफ्यात अधिकाधिक वातानुकूलित बस आणण्यावर भर द्यावा आणि त्यांचे भाडेदर वाढवण्याची मागणी केली. परंतु मुंबई पालिकेकडून बेस्ट उपक्रमाला दरवर्षी मिळणारे अनुदान हे भाडेदर कमी करण्याच्या अटीवरच मिळाले आहे आणि त्यानुसार ५ रुपये तिकीट दर करण्यात आल्याचे बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांनी स्पष्ट केले. शिवाय भाडे वाढवल्यास बेस्टकडे आलेला प्रवासी पुन्हा रिक्षा, टॅक्सी व अन्य सेवांकडे जाण्याची भीतीही आहे. त्यामुळे सध्यातरी बेस्टची भाडेवाढ करण्याचा कोणताही विचार नसल्याचे बागडे यांनी सांगितले.

समिती सदस्यांच्या सूचना

  • बसगाडय़ांची संख्या वाढवा, तोटय़ात चालणारे मार्ग फायद्यात कसे येतील याचा अभ्यास करा.
  • भाडेतत्त्वावरील घेण्यात येणाऱ्या बसच्या नफा-तोटय़ाबाबत माहिती द्यावी
  • वाहतूक व परिवहन विभागात रिक्त असलेली पदे भरा
  • ज्या बसमार्गावर जास्त उत्पन्न मिळते अशा ठिकाणी बसगाडय़ांची संख्या वाढवा.
  • ज्या ठिकाणी प्रवासी संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर मिडी, मिनी बस चालवा.
  • मेट्रो स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांना तेथून वातानुकूलित बस मिळेल, अशाप्रकारे नियोजन.
  • मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी दुमजली बस आणि वातानुकूलित बस उपलब्ध करून देणे.
  • अधिकाधिक पॉइंट टू पॉइंट सेवा देण्यासाठी प्रयत्न.
  • खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकरिता बससेवा उपलब्ध करून देण्याचा विचार करण्याच्या सूचना.