हिंद महासागरात सक्रिय असलेल्या चीनला टक्कर देतानाच शेजारील पाकिस्तानचीही चिंता वाढवणारी ‘स्कॉर्पिन‘ श्रेणीतील तीसरी पाणबुडी आयएनएस ‘करंज’ नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. मेक इन इंडिया अंतर्गत तयार झालेली ही पाणबुडी येत्या १० मार्चला नौदलाच्या सेवेत रुजू होईल.

स्कॉर्पिन श्रेणीतील आयएनएस कलवरी, खंदेरी पाणबुडी यापूर्वी दाखल झाल्या आहेत. करंज रडारच्या कक्षेत येऊ शकत नाही, अशा प्रकारची त्याची बांधणी असल्याची माहिती करंज पाणबुडीचे कमांडिंग अधिकारी कॅ प्टन गौरव मेहता यांनी दिली. त्यामुळे ती पकडली जाणे अशक्य आहे. जमिनीवर हल्ला करण्याबरोबरच ऑक्सिजन बनवण्याची क्षमता पाणबुडीत असून त्यामुळे जास्तीत जास्त ही पाण्याखाली राहू शकते,असेही त्यांनी सांगितले. प्रकल्प ७५ अंतर्गत तयार होणाऱ्या सहा पाणबुडय़ा २०२० पर्यंत सामिल करण्याचे उद्दिष्ट होते. करंज पाणबुडीमुळे कलवरी श्रेणीतील एकूण तीन पाणबुडय़ा नौदलाच्या ताफ्यात येतील.

संख्या वाढली

करंज पाणबुडीमुळे नौदलाचे सामथ्र्य वाढले आहे. भारतातील पाणबुडींची संख्या एकूण १८ झाली आहे. यात १६ पाणबुडी डिझेल व इलेक्ट्रिक इंजिनच्या असून दोन पाणबुडी न्यूक्लिअर इंजिनवर चालणाऱ्या आहेत.

*  करंज पाणबुडी मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेली संपूर्ण भारतीय बनावटीची पाणबुडी आहे.

*  अत्याधुनिक तंत्रज्ञान, शत्रूंना अचूक हेरून त्यांना लक्ष्य करण्याची क्षमता असलेली ही पाणबुडी कमी आवाजामुळे शत्रूंना चकवादेखील देऊ शकते.

*  १८ टॉर्पिडो, जहाजभेदी क्षेपणास्त्रे आदींनी सज्ज.

*   पाणबुडीची लांबी ६७.५ मीटर, तर उंची १२.३ मीटर इतकी आहे.

*  पाणबुडीचे वजन १ हजार ५६५ टन इतके आहे. जास्तीत जास्त काळ पाण्याखाली राहता यावे यासाठी पाणबुडीत ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था.

*  यामध्ये ३९ अधिकारी, कर्मचाऱ्यांची व्यवस्था.

माझगाव डॉकमध्ये बांधणी

करंज पाणबुडीची बांधणी माझगाव डॉकयार्ड लिमिटेडकडून करण्यात आली आहे. पाणबुडीच्या आतील तंत्रज्ञान हे फ्रोन्समधील कं पनीकडून घेण्यात आले आहे. ही डिझेल व इलेक्ट्रिकल इंजिनने चालणारी पाणबुडी आहे. २४ तासांनंतर एकदा चार्ज करावे लागते. याआधी डिसेंबर २०१७ मध्ये कलवरी श्रेणीतील आयएनएस कलवरी पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली.