वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या खुल्या गटातील विद्यार्थ्यांची स्पर्धा अधिकच वाढल्याचे निदर्शनास येत आहे.

राज्याच्या आणि विभागांच्या पहिल्या गुणवत्ता यादीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत खुल्या गटातील अंतिम पात्र विद्यार्थ्यांच्या गुणांत (कट ऑफ) यंदा जवळपास ५० ते ७० गुणांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे नव्याने लागू झालेल्या आणि मराठा आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थी आणि खुल्या गटातील विद्यार्थ्यांच्या गुणांतही अगदी १०० गुणांपर्यंत तफावत असल्याचे दिसत आहे.

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेशयादीत शासकीय महाविद्यालयातील ३ हजार ४५४ जागांवर ३ हजार ३६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून ९४ जागा रिक्त राहिल्या आहेत. यंदापासून पदवी अभ्यासक्रमांनाही मराठा (एसईबीसी) आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) विद्यार्थ्यांसाठी आरक्षण लागू करण्यात आले. त्यामुळे खुल्या गटातील जागा यंदा घटल्या. परिणामी खुल्या गटातील विद्यार्थ्यांचे कट ऑफ यंदा मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीच्या  तुलनेत शासकीय महाविद्यालयांतील खुल्या गटातील कट ऑफ गुणांमध्ये पन्नास ते सत्तर गुणांची वाढ झाली आहे. खुल्या गटातील कट ऑफ गुण आणि मराठा, आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या कट ऑफ गुणांमध्येही मोठय़ा प्रमाणावर तफावत दिसत आहे. गुणानुक्रमांकाचा (कट ऑफ रँक) विचार केल्यास ही तफावत दीड हजार ते सात हजारांच्या दरम्यान आहे. राज्याच्या स्तरावर ३० टक्के जागा राखीव असतात, तर एकूण जागांच्या ७० टक्के जागा या विभागीय स्तरावरील प्रवेशासाठी राखीव असतात.  विभागीय स्तरावर मराठवाडा विभागांत गुणांची तफावत काहीशी कमी दिसत आहे.

रिक्त जागांबाबत संभ्रम

विभागीय स्तरावर काही ठिकाणी एसईबीसीसाठी कमी अर्ज आले आहेत. नियमानुसार या जागा रिक्त राहिल्यास त्या खुल्या गटांत समाविष्ट करण्यात येतात. विभागीय स्तरावर आरक्षण लागू करताना ते त्या विभागातील प्रत्येक प्रवर्गाची विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन व्हावे, अशी पालकांची मागणी आहे. मात्र, एसईबीसीचे प्रवेश देताना आलेल्या एकूण अर्जाचा विचार करण्यात आल्याचा आक्षेप काही पालकांनी घेतला आहे. त्यामध्ये सुधारणा करून विभागानुसार रिक्त जागा खुल्या गटात समाविष्ट कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी आणि पालक करत आहेत.