राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ) यंदा २० ते ३० गुणांनी वाढले आहेत. वाढलेला निकाल, स्थानिक विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा रद्द करण्याचा निर्णय यांमुळे पात्रता गुणांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.

राज्यातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू आहेत. यंदा राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अधिकच चढाओढ पाहायला मिळत आहे. शासकीय आणि खासगी महाविद्यालयांतील खुल्या गटाच्या पात्रता गुणांमध्ये २० ते ३० गुणांची वाढ झाली आहे. मुंबईतील सर्वच शासकीय महाविद्यालयांचे पात्रता गुण ६२५ पेक्षा अधिक आहेत. ५८९ गुणांवर मुंबईतील खासगी महाविद्यालयांची प्रवेश यादी बंद झाली आहे. राज्यातील बहुतेक खासगी महाविद्यालयांतील पात्रता गुणही ५२० पेक्षा अधिक आहेत. मुंबईतील महाविद्यालयांबरोबरच यंदा मराठवाडा आणि विदर्भातील महाविद्यालयांतील पात्रता गुणही वाढले आहेत.

वाढ का?

राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) गुणांनुसार वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया करण्यात येते. यंदा नीटच्या निकालामध्ये वाढ झाली. राज्यातील १ हजार ६७५ विद्यार्थ्यांना नीटमध्ये ६०० पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. त्यापैकी १० विद्यार्थी हे ७०० पेक्षा अधिक गुण मिळवणारे आहेत. नव्याने सुरू झालेल्या शासकीय महाविद्यालयांची भर पडूनही पात्रता गुण कमी झालेले नाहीत. त्याचप्रमाणे यंदा प्रदेशानुसार महाविद्यालयांमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. त्यामुळे मराठवाडा, विदर्भातील महाविद्यालयांतील प्रवेशासाठी मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थीही पात्र ठरले. या भागांतील शासकीय महाविद्यालयांचे पात्रता गुण वाढल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी विदर्भातील शासकीय महाविद्यालयांची पहिल्या फेरीची प्रवेश यादी ही साधारण ५२७ गुणांवर थांबली होती, तर मराठवाडय़ातील शासकीय महाविद्यालयांची प्रवेश यादी ५३५ वर थांबली होती. यंदा राज्यातील खासगी महाविद्यालयांतील पात्रता गुण साधारण ५२९ आहेत तर शासकीय महाविद्यालयांत ५८१ गुण मिळवलेला शेवटचा विद्यार्थी आहे.

मराठवाडा, विदर्भातील स्थानिक विद्यार्थ्यांना फटका

यापूर्वी ७० टक्के जागा स्थानिक विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवण्याचा नियम होता. यंदा तो रद्द केल्याचा फटका मराठवाडा, विदर्भातील स्थानिक विद्यार्थ्यांना काही प्रमाणात बसल्याचे दिसत आहे. स्थानिक विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवल्यामुळे मधल्या स्तरातील विद्यार्थ्यांना राखीव जागांवर प्रवेश मिळू शकत होते. यंदा मात्र या विद्यार्थ्यांना पहिल्या प्रवेश यादीत स्थान मिळाल्याचे दिसत नाही.

नीटचे गुण वाढल्यामुळे यंदा खुल्या गटाचे पात्रता गुण वाढल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी मराठा आरक्षण लागू झाल्यामुळे खुल्या गटातील पात्रता गुण वाढले होते. यंदा आरक्षण नाही तरीही गेल्या वर्षीपेक्षा खुल्या गटाचे पात्रता गुण वाढले आहेत. राज्यातील ७०-३० आरक्षण रद्द केल्याचा परिणामही प्रवेश यादीवर मोठय़ा प्रमाणात झाला आहे.

– सुधा शेणॉय, वैद्यकीय प्रवेश मार्गदर्शक