13 July 2020

News Flash

महिला हिंसाचारात वाढ

महिलांसाठी मुंबई किती सुरक्षित आहे यावर सामान्य नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अमर सदाशिव शैला

पाच वर्षांत घटनांमध्ये ३३ टक्क्यांची वाढ; चालू वर्षांत दरमहा सरासरी ५३३ प्रकरणे

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा आलेख मागील पाच वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात वाढताना दिसत आहे. मागील पाच वर्षांत महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये जवळपास ३३ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. त्यामुळे महिलांसाठी मुंबई किती सुरक्षित आहे यावर सामान्य नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

महिलांवर २०१५ मध्ये दर महिन्याला सरासरी ४०० अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यामध्ये २०१६ मध्ये हे प्रमाण दर महिन्याला ४३१ पर्यंत वाढले. तर २०१७ मध्ये दर महिन्याला हिंसाचाराच्या सरासरी ४५२, २०१८ मध्ये ४९८ घटना घडल्या. यावर्षी ऑक्टोबपर्यंतच्या आकडेवारीवरून यामध्ये दर महिन्याला सरासरी ५३३ पर्यंत वाढ झाली आहे.

यावर्षी ऑक्टोबपर्यंत हिंसाचाराच्या पाच हजार ३३५ घटना समोर आल्या आहेत. तर २०१८ मध्ये संपूर्ण वर्षांत ५९७८, २०१७ मध्ये ५४२५, २०१६ मध्ये ५१७९, २०१५ मध्ये ४८१० घटना समोर आल्या होत्या. आकडेवारीतून महिलांवरील हिंसाचाराचा २०१५ आणि २०१६ चा आकडा यावर्षी ऑक्टोबरमध्येच मागे टाकला असल्याचे दिसत आहे. महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये मागील चार वर्षांपासून वाढ होत आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या या घटनांमध्ये बलात्कार, अपहरण, हुंडय़ावरून होणारे अत्याचार, विनयभंग, छेडछाड, मानसिक-शारीरिक अत्याचाराच्या घटना, खून, आत्महत्या आदींचा समावेश आहे.

अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचे २०१५ मध्ये ४४७ गन्हे नोंद झाले होते. तर २०१६ मध्ये ४५५, २०१७ मध्ये ४६७, २०१८ मध्ये त्यात मोठय़ा प्रमाणात वाढ होऊन ५७० गुन्हे नोंद झाले आहेत. तर यावर्षी आक्टोबपर्यंत अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचा आकडा ४९९ पर्यंत पोहचला आहे.

‘आधीपेक्षा अधिक महिला त्यांच्यावर घडलेल्या अत्याचाराची आता पोलिसांकडे तक्रार करत आहेत. मात्र असे असले तरी महिलांवरील हिंसाचाराच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. दुसरीकडे आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण कमीच आहे. महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी अशा घटनांचे निकाल जलदगती न्यायालयात व्हायला हवेत. त्याचबरोबर फक्त शिक्षा न देता समाजात महिलांकडे पाहण्याच्या मानसिकतेमध्ये बदल घडविण्यासाठी काम करावे लागेल,’ असे मत अक्षरा सेंटरच्या नंदिता शहा यांनी व्यक्त केले.

महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होण्यासाठी मुंबई पोलिसांकडून शाळा, महाविद्यालयांमधून बाल लैंगिक अत्याचार आणि महिला अत्याचारांबाबत शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्याचबरोबर वस्त्यांमध्येही जनजागृती मोहीम राबविली जात आहे. तसेच महिलांच्या मदतीसाठी १०३ हा हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली.

बलात्काराची ८२१ प्रकरणे

महिलांवर होणाऱ्या एकूण बलात्काराच्या घटनाही वाढत आहेत. प्रौढ आणि अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्कारासंबंधी २०१५ मध्ये ७१० गुन्हे नोंद झाले आहेत. २०१६ मध्ये ७१२, २०१७ मध्ये ७५१, २०१८ मध्ये ८८९ घटना घडल्या. तर यावर्षी ऑक्टोबपर्यंत हा आकडा ८२१ पर्यंत पोहचला आहे. प्रौढ महिलांच्या तुलनेत अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण अधिक आहे.

विनयभंग घटनांत वाढ

‘पोक्सो’ अंतर्गत अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाचे २०१७ मध्ये ५६० गुन्हे नोंद झाले होते. २०१६ मध्ये त्यात काहीशी घट होऊन ५४८ घटना घडल्या होत्या. मात्र यावर्षी ऑक्टोबपर्यंत अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाचे ४५३ गुन्हे नोंद झाले आहेत. तर अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनाही चार वर्षांमध्ये वाढताना दिसत आहेत.  यावर्षी सप्टेंबपर्यंत ११४१ मुलींच्या अपहरणाची नोंद झाली आहे.

महिलांवरील हिंसाचाराच्या घटना

वर्ष                  हिंसाचाराच्या घटना

२०१९                         ५३३५

२०१८                         ५९७८

२०१७                         ५४२५

२०१६                         ५१७९

२०१५                         ४८१०

(२०१९ची आकडेवारी ऑक्टोबपर्यंतची)

533 महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांची मासिक सरासरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2019 1:03 am

Web Title: increase in female violence abn 97
Next Stories
1 ‘मातोश्री’शी निष्ठा किशोरी पेडणेकर यांच्या पथ्यावर
2 लोकलच्या चाकांसाठी नवीन वंगण
3 ई-चलन थकवणाऱ्या १०,५०० चालकांवर कठोर कारवाई?
Just Now!
X