मुंबईत झोपडपट्टी परिसराहून अधिक संसर्ग निवासी संकुलात होत असल्याचे शहरातील दुसऱ्या टप्प्यातील सेरो सर्वेक्षणातून स्पष्ट झाले.

या पाहणीत झोपडपट्टी भागात ४५ टक्के तर मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रूंच्या वस्त्यांमध्ये १८ टक्के रहिवाशांमध्ये प्रतिपिंडे तयार झाल्याचे समोर आले. पहिल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत झोपडपट्टीत संसर्गाच्या प्रमाणात जवळपास नऊ टक्क्यांनी घट, तर निवासी संकुलांमध्ये दोन टक्यांनी वाढ नोंदली गेली.

नीती आयोग, मुंबई महानगरपालिका, टाटा मुलभूत संशोधन संस्था(टीआयएफआर) यांच्या संयुक्त विद्यमाने  दहिसर  (आर उत्तर ), चेंबूर (एम पश्चिम )आणि माटुंगा  (एफ उत्तर)  या भागांत जुलैच्या पहिल्या पंधरवडय़ात ६९३६ रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात झोपडपट्टीमध्ये सुमारे ५७ टक्के आणि निवासी संकुलांच्या भागात सुमारे १६ टक्के रहिवासी करोना संसर्गातून मुक्त होऊन त्यांच्या शरीरात प्रतिपिंडे तयार झाल्याचे निदर्शनास आले होते.

याचाच पुढचा टप्पा म्हणून या तीन भागात ऑगस्टमध्ये दुसऱ्यांदा सर्वेक्षण केले होते. यावेळी ५ हजार ३८४ रहिवाशांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात लक्षणे असलेल्या, बरे झालेल्या किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींचा समावेश होता. यातील साधारणपणे एक ते दोन टक्के  रहिवासी हे आधीच्या सर्वेक्षणात सहभागी झाले होते. झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे ४५ टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे १८ टक्के याप्रमाणे रक्तातील प्रतिपिंडांचे प्राबल्य आढळले.

झोपडपट्टी परिसरातील नमून्यांमध्ये प्रतिपिंडाचे प्रमाण आणि निदान झालेल्या बाधित रुग्णांची संख्या याचे विश्लेषण केल्यास झोपडपट्टी परिसरातील संसर्गात काही प्रमाणात घट झाली आहे. पहिल्या फेरीच्या तुलनेत दुसऱ्या फेरीत बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये काही अंशी वाढ झाली आहे.

सर्वेक्षणाच्या दोन्ही फेऱ्यांमध्ये पुरुषांच्या  तुलनेत काही अंशी महिलांमध्ये अधिक प्रतिपिंडे आढळली.

पहिल्या फेरी दरम्यान तीनही विभागांतील लोकसंख्येमध्ये सर्व वयोगटांमध्ये प्रतिपिंडांचे प्रमाण सारखेच होते. परंतु दुसऱ्या फेरीत ४० वर्षांवरील अधिक वयोगटातील व्यक्तींमध्ये काही प्रमाणात अधिक असल्याचे आढळले.

आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिपिंडे

सर्वेक्षणात आरोग्य केंद्र, दवाखाने, आरोग्य कार्यालय आणि क्षेत्रस्तरावर काम करणारे आरोग्य कर्मचारी यांचीही तपासणी झाली. यातील २७ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिपिंडे तयार झाल्याचे आढळले.

*    झोपडपट्टीमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने येथील प्रतिपिंडांचे प्रमाण गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत कमी आढळले. तर बिगर झोपडपट्टी भागात संसर्ग वाढत असल्याने येथील प्रमाण वाढले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तुलनेने प्रतिपिंडाचे प्रमाण कमी आढळले आहे. मुखपट्टी, सॅनिटायजर, सुरक्षित अंतर या नियमांचा वापर केला जात असल्याने हे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. तेव्हा संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी या नियमांचे सगळीकडेच काटेकोर पालन करणे गरजेचे असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

आकडय़ांच्या भाषेत..

*   सहभागी रहिवाशी – ५३८४

प्रतिपिंडांचे प्रमाण

*   झोपडपट्टी – ४५ टक्के

*  बिगर झोपडपट्टी – १८ टक्के