आरोग्यमंत्र्यांचे संके त; रुग्णसंख्या कमी होत नसल्याने निर्णय शक्य

मुंबई: करोनाची राज्यातील लाट थोपविण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करूनही दोनतृतीयांश भागात बाधितांची संख्या वाढत आहे. के वळ १३ जिल्ह्यांत करोना बाधितांचे प्रमाण काहीप्रमाणात कमी होताना दिसत आहे. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिली तर ज्या जिल्ह्यात रुग्णवाढ होईल तेथे संपूर्ण टाळेबंदी करावीच लागेल. तसेच राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू करायची की सध्याचे निर्बंध कमी करायचे याबाबतचा निर्णय १५ तारखेपूर्वी घेतला जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली.

करोनाची साखळी तोडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यभर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे दररोज वाढत जाणाऱ्या करोनाबाधितांच्या आकडेवारीला काही प्रमाणात लगाम लावण्यात सरकारला यश आले आहे. तरीही राज्यात आजमितीस ५५ हजारच्या पुढे दररोज नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे अनेक जिल्ह्यात टाळेबंदी सुरू करण्यात आली असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनीही राज्यातील करोना स्थिती सुधारण्यासाठी राज्यभर कठोर टाळेबंदी लागू करण्याची मागणी के ली आहे. याबाबत बोलताना आरोग्यमंत्री टोपे यांनीही संपूर्ण राज्यात टाळेबंदीचे संके त दिले आहेत. कठोर निर्बंध आणि सर्वप्रकारच्या उपाययोजना, वैद्यकीय व्यवस्था करूनही राज्यातील बाधितांची संख्यावाढ कायम आहे.

राज्याच्या एकतृतीयांश भागात म्हणजेच मुंबई, ठाण्यासह १३ जिल्ह्यांत करोना रुग्णवाढीला लगाम लागला असून दररोजच्या नव्या बाधितांचे प्रमाणही कमी होत आहे. ही सरकारसाठी दिलासादायक बाब असली तरी उर्वरित दोनतृतीयांश भागात म्हणजेच उर्वरित २२ जिल्ह्यांतील करोना स्थिती चिंताजनक आहे. त्यातही काही जिल्ह्यांमध्ये बाधितांची संख्या झपाटयाने वाढत आहे.