शैलजा तिवले

राज्यातील करोनाबाधितांच्या तुलनेत मृतांमध्ये महिनाभरात काही अंशी घट झाली असली तरी नागपूर, चंद्रपूरमधील मृत्यूदरांमध्ये एका टक्क्याने वाढ नोंदविण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली आणि रायगड जिल्ह्यातही मृत्युदरात वाढ झाली आहे.

जुलै-ऑगस्टमध्ये नव्याने आढळलेले रुग्ण आणि मृत्यूच्या नोंदीनुसार जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये राज्याच्या मृत्युदरात ०.३१ ने घट झाली आहे. त्याचवेळी नागपूरच्या मृत्युदरात मात्र जवळपास एका टक्क्याने वाढ झाली आहे. नागपूरमधील रुग्णसंख्याही महिनाभरात ४,४९४ वरून थेट २८,०४२ वर पोहचली आहे, तर मृत्यूचा आलेखही ७० वरून ७३० पर्यंत गेला आहे. जुलैमध्ये शून्य मृत्यूची नोंद असलेल्या चंद्रपूरचा मृत्यूदर ऑगस्टमध्ये एक टक्क्यापर्यंत आला. चंद्रपूरमध्ये आतापर्यंत १९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, रुग्णांचे प्रमाण ४१२ वरून २,३७० पर्यंत वाढले आहे.

कोल्हापूरमध्येही मृत्युदराचे प्रमाण ०.८२ टक्के वाढले आहे. महिनाभरात येथील मृतांची संख्या ९५ वरून ६४६ तर रुग्णांच्या संख्येत पाचपटीहून अधिक वाढ झाली आहे. सांगलीतही मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली असून, मृतांची संख्या ५८ वरून ४२७ वर गेली आहे. सांगलीची रुग्णसंख्याही एका महिन्यात दोन हजारावरून १३ हजारांपर्यत वाढली आहे.

ऑगस्टमध्ये मुंबईच्या मृत्युदरात घट नोंदवण्यात आली. मात्र, एमएमआर परिसरात रायगडचा मृत्यूदर ०.७६ टक्कय़ांनी वाढला आहे. रायगडची रुग्णसंख्या सुमारे १४ हजारांनी वाढली असून, मृतांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. त्याखालोखाल पालघरमधील मृतांचे प्रमाण वाढले असून, येथील मृतांची संख्या ३२२ वरून ५९१ वर पोहचली आहे.

मुंबईतील मृत्युदर सर्वाधिकच

मुंबईत नव्याने आढळणारे रुग्ण आणि मृतांची नोंद यांचे प्रमाण ऑगस्टमध्येही राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे मुंबईचा मृत्यूदर ऑगस्टमध्ये चार टक्के नोंदला आहे. त्याखालोखाल ठाणे (३.१४%), रत्नागिरी (३.२७%), सांगली (३.३०%), कोल्हापूर (३.०७%), लातूर (३.०८%), अकोला (३.०७%), नागपूर (२.८०%) यांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात करोनाचा फैलाव

राज्याच्या रुग्णसंख्येत महिनाभरात ३,८०,७४३ ची भर पडली असून, यात प्रामुख्याने सर्वाधिक वाढ पुणे (८८,८८०), ठाणे (४०,८५६), मुंबई (३२,६०६) येथे  झाली आहे. तसेच आता अन्य जिल्ह्यंमध्ये महिनाभरात नागपूर (२३५४८), नाशिक (२५५४०), कोल्हापूर (१७९०८), जळगाव (१६९९६), अहमदनगर (१५९५०) आणि रायगडमध्ये (१४,१२१) ग्रामीण भागांतील रुग्णसंख्येत वाढ झाली.

टाळेबंदी पूर्णपणे हटवण्याची शास्त्रज्ञांची मागणी

देशातील टाळेबंदी पूर्णपणे मागे घेण्यात यावी असे निवेदन देशभरातील विविध संस्थांतील शास्त्रज्ञांनी सरकारला दिले आहे. ‘कायदा आणि सुव्यवस्थेपेक्षा नागरिकांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे,’ असे या निवेदनांत नमूद केले आहे.

मुंबई, दिल्ली, मद्रास, कानपूर येथील आयआयटी, टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर) यांसह इतर अनेक संस्थांमधील ४० शास्त्रज्ञांचा यात समावेश आहे.

करोनाच्या नियंत्रणासाठी उपाय योजतानाच इतर अनेक समस्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लसीकरण, इतर आजारांवरील उपचार, व्यवस्थापन, गर्भवतींसाठीच्या योजना अशा मुद्दय़ांकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील. सार्वजनिक वाहतुकीवरील निर्बंध आणि इतर निर्बंधांमुळे आर्थिक उलाढालींवरही परिणाम होत आहे. या परिस्थितीत अनेकांसाठी जगणे आव्हानात्मक झाले आहे. नागरिकांच्या आयुष्यावर निर्बंधांचा विपरीत परिणाम होत आहे,’ असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.