राज्य सरकारने नव्याने शिथिल केलेल्या निर्बंधानुसार कारसारख्या चारचाकी गाडय़ांमध्ये चार, तर दुचाकीवर दोन प्रवाशांना प्रवास करण्यास शनिवारपासून परवानगी देण्यात आली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर केंद्र व राज्य सरकारने वाहनांमधील प्रवासी संख्येवर निर्बंध आणले होते. यापूर्वी कारसारख्या छोटय़ा चारचाकी वाहनांमध्ये चालक अधिक दोन अशा तिघांनाच तर दुचाकीवर फक्त चालकालाच परवानगी देण्यात आली होती. चारचाकी किंवा दुचाकीवर क्षमतेपेक्षा जादा प्रवासी असल्यास कारवाई केली जात होती. राज्य सरकारने टाळेबंदीचे निर्बंध ३१ ऑगस्टपर्यंत वाढविताना ५ ऑगस्टपासून मॉल्स आणि व्यापारी संकुले सुरू करण्यासही परवानगी दिली आहे.

गाडय़ांमध्ये चालक अधिक तीन अशा चार प्रवाशांना परवानगी असेल. तसेच दुचाकीवर दोघांना प्रवास करता येईल. रिक्षात चालक अधिक दोन प्रवाशांची वाहतूक करता येईल. प्रवासात मुखपट्टी सक्तीची करण्यात आली आहे. प्रवासी संख्येचे नवे नियम शनिवारपासून अंमलात येतील, असे राज्याचे मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले.

मॉल्स आणि व्यापारी संकुले ५ ऑगस्टपासून सुरू होतील. मार्च महिन्यापासून मॉल्स बंद असल्याने साफसफाईकरिता आठवडय़ाची मुदत देण्यात आली आहे.

‘अत्यावश्यक सेवा’ हा उल्लेख वगळण्याची मागणी

प्रवासी क्षमता वाढविताना राज्य सरकारने ‘फक्त अत्यावश्यक सेवेसाठी’ असा उल्लेख अधिसूचनेत केल्याने पोलिसांना अमर्याद अधिकार प्राप्त होतात, अशी टीका केली जाते. कारण पोलिसांना वाहने अडवून विचारणा करण्याचे अधिकार प्राप्त होतात. ‘अत्यावश्यक सेवा’ हा उल्लेख वगळावा, अशी मागणी रिक्षा चालकांच्या संघटनांनी केली आहे.