नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मुंबईत थंडीचा जोर वाढला की हवेच्या गुणवत्तेची प्रत ढासळते. ‘सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अ‍ॅण्ड वेदर फोरकास्टिंग अ‍ॅण्ड रिसर्च’च्या (सफर) अभ्यासानुसार दिवस जसजसा उतरतो, तसतशी हवा अशुद्ध होत जाते. पहाटेपर्यंत हवा अशुद्ध असते. वातावरणातील या बदलांमुळे मुंबईकर आजारी पडण्याचे प्रमाण वाढते आहे. गेल्या काही दिवसांपासून दमा, फुप्फुसाचे आजार, पडसे, खोकल्याच्या तक्रारी घेऊन दवाखान्यात जात आहेत.

यंदा दिवाळीनंतर प्रथमच हवेची गुणवत्ता खालावल्याचे निर्दशनास आले आहे. गेल्या आठवडय़ापासून मुंबईतील अनेक विभागांत ढासळत गेलेली हवेची गुणवत्ता ‘अत्यंत वाईट’ स्तरापर्यंत पोहचल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे. यात प्रामुख्याने माझगाव, बोरिवली आणि वांद्रे-कुर्ला संकुल या विभागांचा समावेश आहे. रात्रीच्या वेळी कमी होणारे तापमान आणि वाऱ्याचा मंदावणारा वेग यांमुळे हवेच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.

गेल्या आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी मुंबईचे तापमान १९.३ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते आणि हिवाळी हंगाम सुरू झाल्यापासून या दिवशी सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांमधील मुंबईतील रात्रीचे तापमान २० ते २१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. सकाळच्या तुलनेत रात्रीच्या वेळी तापमानात घट होत असल्याने हवा दूषित करणारे ‘पीएम २.५’ व ‘पीएम १०’ घनरूप कण जमिनीलगतच अडकून राहत आहेत.

गेल्या आठवडय़ात मंगळवारी मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा सर्वसाधारण इंडेक्स हा सकाळी २०० म्हणजे ‘समाधानकारक’ स्तरापर्यंत मोजण्यात आला होता. जो रात्री २१० म्हणजे ‘वाईट’ या स्तरापर्यंत वाढल्याची नोंद करण्यात आली. सकाळी गुणवत्तेच्या इंडेक्सची नोंद १९८ (समाधानकारक) या निर्देशांकावरून मध्यरात्री २०४ (वाईट) इंडेक्सपर्यंत नोंदविण्यात आली. गेल्या आठवडय़ातील काही दिवसांमध्ये मुंबईतील सर्वसाधारण हवेच्या गुणवत्तेची नोंद ‘वाईट’ या स्तरापर्यंत नोंदवली गेली असली तरी शहर आणि उपनगरातील काही विभागांत आरोग्यास हानिकारक असणाऱ्या ‘अत्यंत वाईट’ या स्तरापर्यंत हवेची प्रत खालवल्याचे दिसले आहे.

माझगाव विभागात रात्रीच्या वेळेतील गुणवत्तेचा इंडेक्स हा मंगळवारी ३११(अत्यंत वाईट), बुधवारी २९३ (वाईट), गुरुवारी ३०१ (अत्यंत वाईट), शुक्रवारी २९५ (वाईट) तर शनिवारी २६५ (वाईट) या निर्देशांकापर्यंत गेला. बोरिवली विभागात गेल्या आठवडय़ातील गुणवत्तेचा इंडेक्स २५८ ते ३०५ निर्देशांकापर्यंत नोंदवला गेला. वांद्रे -कुर्ला संकुलातही आठवडाभर रात्रीच्या वेळेतील हवेची प्रत ‘अत्यंत वाईट’ या स्तरापर्यंत मोजण्यात आली आहे. यामध्ये शुक्रवारी ३१० (अत्यंत वाईट) हा सर्वात कमी इंडेक्स नोंदविण्यात आला.

  • औद्योगिकीकरण, बांधकाम क्षेत्र, वाढती वाहन संख्या यामुळे मुंबईत प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे नाकातून पाणी येणे, सकाळी उठल्यावर शिंका येणे, खोकला, श्वसनास अडथळा येणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे, असे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. मनोज मस्के यांनी सांगितले. प्रदूषणाचा सर्वाधिक धोका लहान मुले व गरोदर स्त्रियांना बसतो. त्यामुळे त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असेही डॉ. मस्के यांनी सांगितले.

रात्रीच्या वेळी तापमान कमी होत असल्याने प्रदूषणाची घनता वाढते. हवेतील आद्र्रतेमुळे धुके तयार होते. धुक्यामुळे प्रदूषणाचे कण जमिनीलगतच्या भागात अडकून राहतात. सकाळी ज्यावेळी तापमान वाढते, त्यावेळी प्रदूषणाचे हे कण हवेत वाहून जातात. याशिवाय सकाळच्या तुलनेत रात्री वारा वाहण्याचा वेग कमी होत असल्याने प्रदूषणाचे कण वाहून जाण्यास अटकाव होतो. या दोन्ही कारणांमुळे रात्रीच्या वेळेत हवेच्या प्रदूषणात वाढ होते.

–  विद्याधर वालावलकर, पर्यावरणतज्ज्ञ