केशकर्तनकारांकडून विविध सेवांच्या दरांत वाढ

मुंबई : टाळेबंदीमुळे गेले दोन महिने बुडालेला रोजगार आणि सामाजिक अंतर राखण्याच्या नियमामुळे खुच्र्र्याच्या संख्येत करावी लागणारी कपात यामुळे केशकर्तनालय व्यावसायिकांनी केस कापण्याच्या दरांत वाढत केली आहे. शहरी भागांत केस कापण्यासाठी आता दुप्पट दर आकारण्यात येत असून ग्रामीण भागांतही हे दर ४० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे टाळेबंदीच्या काळात वाढलेल्या केसांचा डोक्यावरील भार हलका करण्यासाठी सर्वसामान्यांना खिसाही अधिक हलका करावा लागणार आहे.

टाळेबंदीमुळे केशकर्तन करणाऱ्या कारागिरांचा रोजगार बुडाला असून बहुतांश जणांना गाळे भाडय़ाचा भार सोसावा लागत आहे. तसेच टाळेबंदी उठल्यानंतरही सुरक्षेचे नियम पाळूनच या कारागिरांना व्यवसाय करावा लागणार आहे. परिणामी मुखपट्टी, हातमोजे, सॅनिटायझर, टॉवेल आदींवरील खर्च वाढणार आहे. त्याचबरोबर दोन खुच्र्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टीने दुकानातील काही खुर्च्या कमी कराव्या लागतील. परिणामी सलूनमध्ये काम करणाऱ्या श्रमिकांची संख्या कमी होऊन त्याचा परिणाम उत्पन्नावर होणार आहे. त्याचबरोबर सलूनमध्ये एकाचवेळी येणाऱ्या ग्राहकांची संख्या मर्यादीत ठेवावी लागणार आहे. कारागिरांच्या आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तापमान तपासणीसाठी यंत्रे खरेदी करावी लागतील. त्यातून खर्चात  दरवाढ करण्याशिवाय गत्यंतर नाही, असे महामंडळाचे म्हणणे आहे.

निम्म शहरी भागातही के स कापण्याच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तेथे केस कापण्यासाठी आधी ७० रुपये आकारले जात, ते आता १०० रुपये आकारले जाणार आहेत. तर निम्नशहरी भागातील साध्या दाढीचा दर ४० रुपयांवरून ५० रुपये, साध्या फेस मसाज ७० रुपयांवरून १५० ते २०० रुपये, हेड मसाज ५० रुपयांवरून १०० रुपयांपर्यंत  वाढविण्यात आला आहे. विविध भाग, तेथील गाळा भाडय़ांचे दर, तसेच नाभिकांकडून ग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा यांच्यानुसार दरांमध्ये चढ-उतार होतील असेही स्पष्ट करण्यात आले.

मुख्यमंत्री निधीला मदत

‘सरकारकडून नाभिकांना कोणतेही सहाय्य मिळाले नाही. त्याचबरोबर ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नवीन बदल स्वीकारणे भाग आहे. त्यातून खर्चात मोठी वाढ अपेक्षित आहे. या परिस्थितीत आधीच्या दरात व्यवसाय सुरू ठेवणे शक्य नाही. त्यामुळे ही दरवाढ करत आहोत. परिस्थिती पुर्ववत झाल्यास ती मागे घेण्याचा विचार केला जाईल. तसेच दरवाढ करून मिळणाऱ्या अतिरिक्त रकमेतील १० टक्के निधी करोनाविरोधातील लढय़ासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार आहोत,’अशी माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याण दळे यांनी दिली.

दर पत्रक (मुंबई)

                                आधी                     नवीन

साधे केशकर्तन          १००                     २००

साधी दाढी                   ५०-६०              ८०-१००

साधा फेस मसाज      १५०-२००            २५०-३००

हेड मसाज                  १५०-२००        २५०-३००

साधे फेशिअल            ५००-७००         ८००-१०००