शैलजा तिवले

राज्यात मुंबई-पुण्यासह आता औरंगाबाद, जळगाव, सोलापूर अशा इतर जिल्ह्यांमध्ये करोना संसर्ग फोफावत असून मृत्यूचे प्रमाणही ३ टक्कय़ांनी वाढले आहे.

गेल्या महिनाभरात जळगाव ग्रामीण भागातील रुग्णसंख्या १६२ वरून १,३४२ वर आणि मृत्यूदर ८.४९ टक्के नोंदला आहे. या खालोखाल महानगरपालिका क्षेत्रात सोलापूर येथे ६.५२ आणि औरंगाबादमध्ये ५.२७ मृत्यूदराची नोंद आहे. राज्याचा मृत्यूदर ३.६७ आहे, तर सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबईचा मृत्यूदर ३.७४ आहे.

अकोला, पिंपरी-चिंचवड, नागपूर, मालेगाव अशी बहुतांश रुग्णवाढ आणि मृत्यूची संख्या ही नगरपालिका क्षेत्रात झाली असली तरी जळगावसह काही ग्रामीण भागातही मृतांचे प्रमाण वाढले आहे. यात सातारा (२८) रत्नागिरी (१५) यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मृतांचे प्रमाण शून्य असलेल्या अनेक जिल्ह्यांमध्ये महिनाभरात मृत्यूची नोंद झाली आहे. यात ग्रामीण भागातील नाशिक (१२), सांगली (६), सोलापूर (८), कोल्हापूर (८), जालना (६), लातूर (८), अकोला (६) हे आहेत.

केळीच्या बागांमध्ये बाहेरून येणारे व्यापारी, शहरांमधून स्थलांतराच्या काळात तात्पुरता आसरा घेण्यासाठी मोठय़ा संख्येने आलेले लोक आणि जवळच रेल्वेचे भुसावळ जंक्शन यामुळे जळगाव ग्रामीण भागात करोना संसर्ग झपाटय़ाने वाढल्याचे निरीक्षण जळगावचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी नोंदविले. सुरूवातीच्या टप्प्यात तपासणी सुविधांचा अभाव असल्याने औरंगाबाद, धुळे येथे नमुने पाठविले जात होते. अहवाल येण्यास आठ दिवसांहून अधिक कालावधी लागत होता. परिणामी रुग्णांचे निदान होण्यास विलंब होत होता. बहुतांश रुग्ण खासगी दवाखान्यांमध्ये बराच काळ उपचार घेतल्यानंतर गंभीर प्रकृती झाल्यावर दाखल होतात. तसेच वैद्यकीय महाविद्यालय नवीनच असल्याने मनुष्यबळापासून अनेक अडचणी असल्याचे जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी व्यक्त केले.

दाट वस्ती असलेल्या काही भागांमध्ये संसर्ग प्रसार गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. मुंबई-पुण्याहून फारसे प्रवासी शहरात आलेले नाहीत. त्यामुळे हा प्रसार याच वस्त्यांमधून पसरत असल्याचे स्पष्ट करताना औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पडळकर म्हणाल्या, ‘रुग्ण दाखल झाल्यानंतर अगदी एक ते दोन दिवसांमध्ये प्रकृती अचानक गंभीर होऊन मृत्यू होत असल्याचे वारंवार घडत आहे. तसेच भीतीनेही रुग्ण उपचारासाठी विलंबाने येत असल्याचे निदर्शनास आले.’

इतर आजारांच्या रुग्णांना धोका

मृतांमध्ये इतर आजार असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असून रुग्ण दाखल होण्यास विलंब होत आहे का, उपचार पद्धती काय सुरू आहेत याबाबत जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांशी विशेष कृती दलाशी चर्चा सुरू असल्याची माहिती विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी दिली.

रुग्णालयात दाखल होण्यास विलंब 

वारंवार सूचना देऊनही लक्षणांकडे दुर्लक्ष करणे आणि भीतीने किंवा अन्य कारणांमुळे रुग्ण उशीरा उपचारासाठी दाखल होणे ही प्रामुख्याने कारणे दिसत असून याचे विश्लेषण सध्या सुरू असल्याचे आरोग्य आयुक्तालयाच्या संचालक डॉ. साधना तायडे यांनी सांगितले.