News Flash

मुंबईत पुन्हा करोना रुग्णसंख्येत वाढ

मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यामुळे रुग्णांचा आकडाही वाढू लागला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईतील रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा वाढला असून शुक्रवारी १,४०६ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यामुळे रुग्णांचा आकडाही वाढू लागला आहे.

गेल्या काही दिवसांपासून एका दिवसातील रुग्णांची संख्या हजाराच्या आत असताना शुक्रवारी  हा आकडा वाढला आहे. एका दिवसात १,४०६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या दरदिवशी सरासरी साडेसात हजार चाचण्या केल्या जात आहेत. चाचण्या कमी केल्या जात असल्याबद्दल पालिकेवर नेहमी टीका होत असते. त्यामुळे पालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार सर्वच विभागांनी मोफत चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. त्यात प्रतिजन चाचण्या आणि घशातील स्राव घेऊन केली जाणारी आरटीपीसीआर चाचणी अशा दोन्ही चाचण्यांचा समावेश आहे. त्यामुळे रुग्ण आढळण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १,३४,२२३ वर गेली आहे. तर १२३५ रुग्ण एका दिवसात बरे होऊन घरी गेले आहेत.

देशात २४ तासांत ६८,८९८ रुग्ण

नवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांमध्ये रुग्णसंख्येची सर्वाधिक ६८ हजार ८९८ इतकी वाढ  शुक्रवारी नोंदवण्यात आली असून ९८३ मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. देशातील करोना रुग्णांचा आकडा २९ लाख ५ हजार ८२३ वर पोहोचला असून आत्तापर्यंत ५४ हजार ८४९ रुग्ण दगावले. करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही गेल्या चोवीस तासांमध्ये विक्रमी वाढ झाली असून गुरुवारी दिवसभरात ६२ हजार २८३ रुग्ण बरे झाले. करोनामुक्त होण्याचे प्रमाण आता ७४.३० टक्क्यांवर गेले आहे.

राज्यात दुसऱ्या दिवशीही १४ हजारांपेक्षा अधिक रुग्ण

मुंबई  :  राज्यात लागोपाठ दुसऱ्या दिवशी १४ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले असून, करोनामुळे ३३९ जणांचा मृत्यू झाला. मुंबई, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईतील रुग्ण संख्या तुलनेत वाढली आहे.  गेल्या २४ तासांत राज्यात १४,१६१  रुग्ण आढळले असून, करोनाबाधितांची एकू ण संख्या ६ लाख ५७ हजार झाली. आतापर्यंत २१,६९८ जणांचा  मृत्यू झाला.

५० वर्षांवरील रुग्णांना गृह अलगीकरणास परवानगी

मुंबई : ५० वर्षांवरील सर्वच करोना रुग्णांना करोना उपचार केंद्रात दाखल करण्याची सक्ती करणाऱ्या नियमावर टीका झाल्यानंतर मुंबई महापालिके ने हा नियम शिथील के ला आहे. आता कोणतेही अन्य आजार नसलेल्या आणि करोनाची लक्षणे नसलेल्या ५० वर्षांवरील करोना रुग्णांना घरीच राहून उपचार घेता येणार आहेत.

६० वर्षांखालील ज्या करोना रुग्णांत कोणतीही लक्षणे नाहीत, अन्य कोणतेही आजार नाहीत अशा रुग्णांना घरात शौचालय असल्यास घरीच राहण्याची परवानगी दिली जात होती. या नियमात गुरुवारी पालिकेने बदल केला व ५० वर्षांवरील सर्वच रुग्णांना गृह अलगीकरणाची परवानगी नाकारली होती. पालिकेच्या या नियमावर असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सलटंटचे अध्यक्ष डॉ. दीपक बैद यांनी टीका केली होती.  त्यामुळे ५० वर्षांवरील रुग्ण चाचण्या करून घेण्यास पुढेच येणार नाहीत, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.

निर्जंतुकीकरणाबद्दलही घन कचरा विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. एखाद्या इमारतीत रुग्ण आढळल्यास किमान एकदा निर्जंतुकीकरण केले जावे . रुग्ण राहत असलेले घर आणि इमारतीतील सार्वजनिक भाग निर्जंतूक करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 12:33 am

Web Title: increase in the number of corona patients in mumbai again abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘लोकसत्ता इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा’
2 १ लाख ३० हजार कर्मचारी रेल्वेच्या ई-पासपासून वंचित
3 करोना रुग्णांसाठी सहायक उपचार पद्धतींचीही गरज
Just Now!
X