सुशांत मोरे

टाळेबंदी शिथिल होताच मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये जूनमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील (आरटीओ) नव्या वाहनांच्या नोंदणीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी या कार्यालयांत जूनमध्ये एकू ण ३ हजार १२८ वाहनांची नोंद झाली. यामध्ये १ हजार ८८५ दुचाकी, तर १ हजार १२९ चारचाकी वाहने असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. उर्वरित वाहनांमध्ये रिक्षा, टॅक्सी आदींचा समावेश आहे.

८ जूनपासून मुंबई महानगर परिसरात टाळेबंदी शिथिल झाली आणि हळूहळू वाहनांची विक्री केंद्रे खुली झाली. ती सध्या चांगलीच गजबजलेली आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवा सर्वसामान्यांसाठी नसल्याने, तसेच करोनाच्या धास्तीने अनेक जण कामावर जाण्याकरिता खासगी वाहनाला पसंती देत आहेत. वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद असल्याचे आरटीओ कार्यालयांमधील नोंदणीवरूनही दिसून येत आहे.

ठाणे, कल्याणमध्येही नव्या वाहनांची नोंदणी होत आहे. ठाणे आरटीओत एकू ण १ हजार २९९ वाहनांची नोंद झाली असून यामध्ये ७८७ दुचाकी आणि ४०८ चारचाकी, तर ९६ रिक्षांचा समावेश आहे. कल्याण आरटीओतही १ हजार ५०४ वाहनांची नोंद झाली असून त्यात ४३५ चारचाकी आणि १ हजार ४५ दुचाकी आणि अन्य वाहने आहेत.

टाळेबंदी काळात म्हणजे मे महिन्यातही आरटीओंचे वाहन नोंदणीचे काम सुरू होते. मे महिन्यात मार्च, एप्रिलमध्ये खरेदी झालेल्या वाहन नोंदणीची कामे झाली. अर्थात त्या वेळी ताडदेव आरटीओत फक्त ७९ चारचाकी वाहनांची नोंद झाली. वडाळा आरटीओत १५ (पैकी १२ चारचाकी) वाहनांची नोंद झाली. अंधेरी आरटीओत के वळ चार वाहनांची नोंद झाली. यातील तीन वाहने चारचाकी व एक दुचाकी आहे. ठाणे आरटीओतही मे महिन्यात २८ आणि कल्याण आरटीओत ७५ वाहनांची नोंद आहे.

२३ कोटींचा महसूल

वाहन नोंदणीत वाढ झाल्याने मुंबईतील तीनही प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा जूनमधील महसूल वाढला आहे. त्यांचा एकत्रित महसूल २३ कोटी ६४ लाख रुपये आहे. यामध्ये सर्वाधिक महसूल ताडदेवचा असून त्यानंतर अंधेरी आणि वडाळ्याचा क्रमांक आहे.