संदीप आचार्य

जाहीर न केलेल्या ४५१ करोना मृत्यू प्रकरणामुळे प्रचंड खळबळ उडाल्यानंतर महापालिकेने युद्धपातळीवर मृत्यूंबाबत विश्लेषणाचे काम सोमवारी पूर्ण केले. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या नोंदीत लपलेले ८६२ करोना मृत्यू उघड झाले असून, राज्यात अन्यत्र ४६६ करोना मृत्यू उघडकीस आल्याने एप्रिलपासून नोंदविण्यात न आलेले १३२८ करोना मृत्यू मंगळवारी सरकारला जाहीर करावे लागले.

‘लोकसत्ता’ने याबाबतचे वृत्त दिले होते. त्यात ४५१ मृत्यू हे करोनाबळी असल्याचे तसेच सुमारे ५०० मृत्यूंचे विश्लेषण बाकी असल्याचे अघडकीस आणले होते. राज्यात १३२८ वाढीव मृत्यू उघडकीस आल्यामुळे राज्याचा मृत्यूदर ३.७ टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत जाणार आहे.

मुंबई महापालिकेने एप्रिलमधील जवळपास ४५१ करोनाबळी हे ‘करोना मृत्यू’ नसल्याची भूमिका घेतल्याने पालिका संशयाच्या भोवऱ्यात अडकली. ८ जून रोजी महापालिकेने आरोग्य विभागाला पाठवलेल्या यादी व मेलमध्ये हे ४५१ मृत्यू करोनाचे असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर १२ जून रोजी पाठवलेल्या मेलमध्ये हे करोना मृत्यू म्हणून गृहित धरू नये, अशी भूमिका पालिकेने घेतल्याचे आता स्पष्ट होत आहे. याबाबत पालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांकडे विचारणा करूनही कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही.

मुख्य सचिव अजोय मेहता यांनी या प्रकरणाची दखल घेत मुंबई महापालिकेतील एकूणच करोना मृत्यूंची माहिती दोन दिवसांत जाहीर केली जाईल, असे स्पष्ट केले होते. तसेच यात कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले होते. या पाश्र्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून पालिकेने शिल्लक मृत्यूप्रकरणांचे विश्लेषण करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. यासाठी ‘डेथ ऑडिट कमिटी’पुढे सर्व कागदपत्रे येणे आवश्यक होते. काही मृत्यूप्रकरणांची कागदपत्रे अपलोड होण्यास वेळ लागत असल्याने पालिकेने शेवटी पेन ड्राईव्हवर सर्व कागदपत्रे घेऊन सोमवारी विश्लेषणाचे काम पूर्ण केले. यासाठी समितीत जवळपास वीस तज्ज्ञांनी काम केल्याचे समितीतील एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.