शहरातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णांचे चाचणी अहवाल लवकरात लवकर उपलब्ध करून द्या, रुग्णालयातील रुग्णशय्यांचे व्यवस्थापन आणि प्राणवायू पुरवठा, औषधांची उपलब्धता या सर्व बाबींवर विशेष लक्ष द्या तसेच रुग्णशय्या आणखी वाढविण्यावर भर देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई महापालिके स दिले. त्यावर शहरात पुरेशा रुग्णशय्या उपलब्ध असल्याचा दावा आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी के ला.

महानगरपालिका क्षेत्रातील करोना संसर्ग परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून घेतला. या बैठकीत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी उपस्थित होते.

मुंबईमध्ये साधारणत: १० फेब्रुवारीपासून करोनाची दुसरी लाट आली असली तरी  दैनंदिन रुग्णांमध्ये सुमारे ८५ टक्के हे लक्षणे नसलेले करोनाबाधित आहेत. शहरात १५३ करोना रुग्णालये असून त्यामध्ये सध्या २० हजार ४०० रुग्णशय्या आहेत. येत्या आठवड्यात ही संख्या २२ हजार होईल.  दैनंदिन बाधित रुग्ण संख्या आता ८ ते १० हजारादरम्यान स्थिरावली असली तरी दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील १० हजारांच्या घरात आहे. यामुळे रुग्ण संख्या वाढूनही आज मितीस ३ हजार ९०० रुग्णशय्या रिक्त/उपलब्ध आहेत. मोठ्या खासगी रुग्णालयांमधून बरे होत आलेल्या आणि प्राणवायू पुरवठ्याची गरज नसलेल्या रुग्णांना स्थानांतरित करण्यासाठी हॉटेल्स संलग्न करून देण्यात येत असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली.

अहवाल लवकर देणार

करोना चाचणीचा अहवाल २४ तासांच्या आत देण्याच्या सूचना सर्व प्रयोगशाळांना देण्यात आल्या आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने प्रतिजन चाचणी करावी. त्यात बाधित आढळले तर त्यांचे विलगीकरण करून, आरटीपीसीआर चाचणी करावी, जेणेकरून बाधित रुग्ण वेळीच शोधता येतील व आरटीपीसीआर चाचण्यांवरील ताणही कमी होईल, अशी सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. ही सूचना तातडीने अमलात आणण्याची ग्वाही चहल यांनी दिली.

‘मुंबईतील पावसाळ्यापूर्वीची कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करा’

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी पावसाळ्यापूर्वीच्या कामांवर त्याचा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी आणि नालेसफाईसह साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. पावसाळ्यापूर्वीची सारी कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करावीत, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई महानगरपालिके स दिले.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून  शहरातील पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा घेतला.