News Flash

वाहतूक नियमांच्या उल्लंघनात वाढ

पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे उल्लंघन करणारे चालक सहजरीत्या कॅमेऱ्यात कैद होतात.

(संग्रहित छायाचित्र)

आठ महिन्यांत १०,०९१ तक्रारींची नोंद

मुंबईतील रस्ते अपघातांत गेल्या चार वर्षांच्या तुलनेत घट झाली असली तरी वाहतूक नियमभंगाच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. यात बेदरकारपणे वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, विनाहेल्मेट, सीटबेल्ट न लावणे, दारू पिऊन वाहन चालवण्याचे प्रकार जास्त आहेत. त्यामुळे येत्या काळात वाहतुकीला शिस्त लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांना पेलावे लागणार आहे.

मुंबईत सर्वत्र सीसीटीव्हीच्या आधारे वाहतुकीवर देखरेख ठेवली जात आहे. पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे उल्लंघन करणारे चालक सहजरीत्या कॅमेऱ्यात कैद होतात. दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी २०१८ मध्ये ११,७११ तक्रारी नोंदवल्या गेल्या. २०१९च्या आठ महिन्यांत अशा १० हजार ९१ प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे गेल्या चार वर्षांच्या तुलनेत २०१८ मध्ये मुंबईतील अपघातांची संख्या २२ टक्क्यांनी कमी झाली आहे. तर २०१९ मध्येही अपघात बऱ्यांपैकी कमी झाल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली. मुंबई वाहतूक पोलीस आणि ब्लूमबर्ग फिलन्टथ्रॉपी इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी या संस्थेने गुरुवारी रस्ते सुरक्षा वार्षिक अहवाल २०१८ सादर केला. यात ही माहिती देण्यात आली.

अहवालानुसार मुंबईत २०१५मध्ये रस्ते अपघातांत ६११ जणांचा मृत्यू झाला होता. २०१८मध्ये ही संख्या ४७५ वर आली आहे. अर्थात अपघातात बळी पडणाऱ्यांमध्ये पादचाऱ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे ५१ टक्के आहे. त्याखालोखाल दुचाकीस्वार (२८ टक्के), दुचाकीवरील सहकारी(१३ टक्के) यांचा अपघातात बळी गेला आहे. तर पाच टक्के मृत्यू तीनचाकी व चारचाकी चालकांचे, दोन टक्के तीनचाकी, चारचाकीतून प्रवास करणाऱ्यांचे आणि १ टक्का मृत्यू सायकलस्वारांचे आहेत.

या वर्षीही अपघातात घट झाली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०१९ मध्ये एकूण १ हजार ९२३

अपघात झाले. २०१८ मध्ये ही संख्या २ हजार ८० इतकी होती. यात गेल्या वर्षी आठ महिन्यांत ३०० जणांचा मृत्यू झाला. तर यंदा विविध अपघातांत २४९ जणांना प्राण गमवावे लागल्याचे सहपोलीस आयुक्त (वाहतूक) मधुकर पाण्डेय यांनी सांगितले.

सर्वाधिक बळी पादचाऱ्यांचे

२०१८ मध्ये मुंबईत रस्ते अपघातांत ४७५ जणांचा मृत्यू झाला. यात २४३ पादचाऱ्यांचा समावेश आहे. रिक्षाच्या धडकेत २९ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला असून चारचाकी वाहनांच्या धडकेत ५१ आणि दुचाकीस्वारांच्या धडकेत ६२ जणांनी प्राण गमावले आहेत. तर गेल्या वर्षी दुचाकीस्वारांचेही मोठय़ा प्रमाणात अपघात घडले. १९४ दुचाकीचालक आणि सहकारी प्रवाशांनी प्राण गमावले. अन्य दुचाकीस्वारांच्या चुकीमुळे समोरून येणारे ९२ दुचाकीचालक आणि सहकारी प्रवासी ठार झाले आहेत.

मृतांमध्ये तरुण अधिक

अपघातांतील मृतांमध्ये ८५ टक्के पुरुष आणि १५ टक्के महिला आहेत. सर्वाधिक मृत्यू २० ते २९ वयोगटातील तरुण व तरुणींचे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 1:46 am

Web Title: increase violation traffic rules akp 94
Next Stories
1 टोलमुक्तीची आश्वासने हवेतच
2 ईशान्य मुंबईत युतीला आव्हान
3 वृक्षारोपण आणि पुनर्रोपणाच्या पद्धतीवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
Just Now!
X