गडचिरोलीतूनही भ्रष्टाचाराच्या तक्रारीत मोठी वाढ

गेल्या वर्षभरात गडचिरोलीसारख्या परिसरातून भ्रष्ट अधिकाऱ्यांबाबत तब्बल १७४ तक्रारी प्राप्त झाल्या. आता सुरुवातीच्या चार महिन्यांत ही संख्या ६० ते ७० इतकी झाली आहे. याआधी या परिसरातून एकही तक्रार प्राप्त होत नव्हती, परंतु या काळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. गावातील आठवडा बाजारात तसेच वार्षिक जत्रेत स्टॉल लावून नागरिकांमध्ये मोबाइल अ‍ॅप, व्हॉटस्अपसारख्या यंत्रणांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केल्यानंतरच हा फरक पडल्याचा दावाही एसीबीने केला आहे.

राज्याचे विद्यमान महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी एसीबीचे प्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर दोन-तीन महिन्यांतच तक्रारींचा वेग कमालीचा वाढला होता. भ्रष्ट अधिकाऱ्याची छायाचित्रे प्रकाशित केली जाऊ लागली. त्यानंतर वर्षभरात आतापर्यंत कधीही न झालेली कारवाई झाली होती. ठरावीक परिसरातूनच भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत होते. विशेषत: गावांतून येणाऱ्या तक्रारींची संख्या कमी होती. गडचिरोली-चंद्रपूरसारख्या कानाकोपऱ्यातून क्वचितच तक्रार येत असे. स्मार्ट फोनचा वापर कानाकोपऱ्यात होत असल्यामुळे त्यासाठी विशेष अ‍ॅप तयार करणे तसेच व्हॉटस्अप क्रमांक सुरू केल्यानंतर त्यात कमालीची वाढ दिसू लागली. आता एकटय़ा गडचिरोली वा चंद्रपूर परिसरातून भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध येणाऱ्या तक्रारींमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यापैकी अनेक तक्रारी या अ‍ॅपवर वा व्हॉटस्अपद्वारे येऊ लागल्या आहेत.गावागावांत एसीबीच्या कार्यपद्धतीची माहिती व्हावी यासाठी पथनाटय़ाचाही आधार घेण्यात आला. लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद कार्यालयांबाहेर विशेष मोहीम राबविण्यात आली. गावागावांत भरणाऱ्या आठवडय़ाच्या बाजारात लोकांचे लक्ष वेधण्यासाठी खास कार्यक्रम करण्यात आले.जत्रेत स्टॉल उभारून एसीबीचे अधिकारी तक्रार कशी करायची याबाबत मार्गदर्शन करू लागले.

  • भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्याबाबत शहरे आघाडीवर आहेत. त्या तुलनेत ग्रामीण भागातून कमी प्रतिसाद मिळत असतो.
  • एखाद्या अधिकारी वा कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार करणे म्हणजे संपूर्ण कार्यालयाचा राग ओढवून घेणे, असा समज करून ग्रामीण भागातून तक्रारदार मिळत नव्हते. परंतु जनजागृतीमुळे आता लोकही पुढे येऊ लागली आहेत, असेही या सूत्रांनी सांगितले. ’ एखाद्या अधिकाऱ्याला वा कर्मचाऱ्याला पकडून दिल्यानंतर तुमचे काम होणार नाही, असा जो समज आहे तो त्यामुळे दूर होऊ लागला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.