करोनाच्या छायेतही यंदा सणखरेदीच्या उत्साहाला उधाण आल्याचे चित्र राज्यभरातील सर्वच शहरगावांत दिसून आले. दसरा-दिवाळीच्या कालावधीत राज्यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा ३६ टक्के अधिक घरांची विक्री झाली. नोव्हेंबरच्या १३ दिवसात मुंबईकरांनी १०,४५९ वाहने खरेदी केली, तर मॉल्समध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ७० टक्के अधिक उलाढाल झाली.

राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीचा सकारात्मक परिणाम बांधकाम क्षेत्रावर दिसला. मुंबईमध्ये नोव्हेंबरच्या १९ दिवसांत तब्बल ६,४९४ मालमत्तांची (घरे, व्यापारी गाळे इत्यादी) विक्री झाली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ५,५७४ मालमत्ता विकल्या गेल्या होत्या. त्या तुलनेत यंदा मोठी वाढ झाली. मात्र, मुद्रांक शुल्कातील सवलतीमुळे राज्य सरकारचे उत्पन्न निम्म्यावर आले आहे. राज्य सरकारने बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी करात घसघशीत सवलत दिली. त्यातून मुंबईत यंदा सप्टेंबर महिन्यात ५,५९७ घरे, तसेच दुकानांची विक्री झाली. तर गेल्यावर्षी याचकाळात ४,०३२ घरे-दुकाने विकली गेली होती.

ऑक्टोबरमध्ये विक्रीने (७,९२९) उच्चांक गाठला. गेल्या वर्षी याच काळात ५,८११ घरे विकली गेली होती. वर्ष २०१८ आणि २०१९ पेक्षा यंदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात घरांची विक्री वाढली.

महसूल किती?

– घरांच्या खरेदी विक्रीतून सरकारला यंदा सप्टेंबरमध्ये १८०.५३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गतवर्षी याच काळात ३४७.५७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. तर यंदा ऑक्टोबर महिन्यात महसुलात वाढ होऊन तो २३२.८० कोटी रुपयांपर्यंत पोहचला असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत २०९ कोटी रुपयांची घट आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ४४२.५६ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. तर यंदा नोव्हेंबर महिन्यात पहिल्या १९ दिवसांत १८७.९२ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात ४२८.८१ कोटी रुपयांचा महसूल सरकारदरबारी जमा झाला होता.

– सरकारने तीन टक्के स्टॅम्प डय़ूटी घटविली, तर अनेक विकासकांनी उर्वरित स्टॅम्प डय़ूटी खरेदीदारांकडून न घेता त्याची स्वत:च पूर्तता केली. डिसेंबरमध्येही करात सवलत दिल्याने ग्राहकांकडून याच पद्धतीने चांगला प्रतिसाद मिळेल, असे नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिलचे महाराष्ट्र अध्यक्ष राजन बांदेलकर यांनी सांगितले.

सणकाळात उभारी..

बांधकाम क्षेत्र करोनाच्या कालावधीमध्ये खालावले होते. त्याला उभारी देण्यासाठी राज्य शासनाने २६ ऑगस्टला दस्त नोंदणीवरील मुद्रांक शुल्कात कपातीचा निर्णय घेतला. त्यानुसार १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीसाठी मुद्रांक शुल्कात तीन टक्क्य़ांनी, तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत ते दोन टक्क्य़ांनी कमी करण्यात आले आहेत. याचा परिणाम सणाच्या कालावधीत घरखरेदीत दिसला.

दुचाकी-मोटारींकडे ओढ..

मुंबई :  मुंबईत नोव्हेंबरच्या १३ तारखेपर्यंत एकूण १०,४५९ वाहनांची विक्री झाली. वाहनांच्या विक्रीबरोबरच व्यावसायिक वाहनांसाठी ११८ परवाने देण्यात आले. तर नोव्हेंबरमधील १३ दिवसांच्या विक्रीतून सरकारला ५४ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला.  ठाणे आरटीओकडे ४९३२ आणि वसई आरटीओकडे ३८८५ वाहनांची नोंदणी झाली. याबरोबरच व्यावसायिक वाहनांसाठी ठाण्यातून १७४ परवाने, तर वसईमधून ११४ परवाने वितरीत करण्यात आले . ठाण्यातून २३ कोटी ५५ लाख रुपये आणि वसईतून १० कोटी ७४ लाख रुपयांचा महसूल शासनाला मिळाला.

सवलतींना जोरदार प्रतिसाद..

मॉल्समधील अनेक सवलती, बक्षीस सोडत योजनांना मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेक ठिकाणी गेल्या वर्षीच्या तुलनेत ७० टक्केपर्यंत विक्री झाली. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि गृह सजावटीच्या वस्तूंना अधिक मागणी होती. करोनापूर्व काळाप्रमाणे गेल्या पंधरा दिवसांत प्रतिसाद मिळाल्याचे गोरेगाव येथील ओबेरॉय मॉलचे महाव्यवस्थापक अनुज अरोरा यांनी सांगितले. घाटकोपर येथील आर सिटी मॉल, ठाण्यातील  विवियाना मॉल, नवी मुंबई येथील सी वूड्स मॉलमध्येही तशीच स्थिती होती.