वाढलेले किमान तापमान आणि स्थिर असलेले कमाल तापमान, इत्यादी कारणांमुळे गुरुवारी मुंबईच्या आर्द्रतेत ४ ते ५ टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे दिवसभर वातावरण ढगाळ होते.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकण किनारपट्टीत आर्द्रतेचे प्रमाण अधिक दिसत असून पावसाळी वातावरण आहे. काही ठिकाणी पावसाचा शिडकावाही झाला आहे. सोमवारपासून मुंबईच्या किमान तापमानात वाढ झाली असून बुधवारी आणि गुरुवारी किमान तापमानाचा पारा २७ अंश सेल्सिअसवर स्थिर राहिला; मात्र आद्र्रतेत वाढ झाली. बुधवारी सांताकू्रझ येथे ६६ टक्के आद्र्रता होती, ती वाढून गुरुवारी ७१ टक्क्यांपर्यंत गेली. कुलाबा येथे बुधवारी ७६ टक्के  आद्र्रतेची नोंद झाली होती. यात वाढ होऊन गुरुवारी ८१ टक्के  इतकी आद्र्रता नोंदवली गेली.

मुंबईतील कमाल तापमानात फार मोठी वाढ झाली नाही. रत्नागिरी येथे मात्र घट दिसून आली. बुधवारी रत्नागिरी येथे ३६.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. गुरुवारी ते ३४.२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. अलिबाग येथील कमाल तापमानातही घट झाली असून पारा ३५.१ अंशावरून ३३.१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. दोन्ही ठिकाणी आर्द्रतेत २ ते ३ अंशांची घट दिसून आली.